सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास साधण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सागरी पर्यटनासह ग्रामीण पर्यटनासाठी या आर्थिक वर्षांत विविध योजनांअंतर्गत १४५ कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान कास येथे बजाज फूड कंपनीच्या माध्यमातून सुमारे साठ एकर क्षेत्रात बजाज फूड पार्क उभे करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व गृह राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सावंतवाडी नगरपालिका पर्यटन स्वागत केंद्राच्या स्थळी व्हिजन सिंधुदुर्ग कार्यालय व पर्यटन मार्गदर्शन केंद्राचे शुभारंभ प्रसंगी दीपक केसरकर बोलत होते. यावेळी उद्योजक अनंत भालेकर, नगराध्यक्ष बबन साळगांवकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, उद्योजक महेश कुमठेकर, व्हिजन सिंधुदुर्गचे अध्यक्ष मकरंद चुरी, कार्याध्यक्ष बाळासाहेब परुळेकर, सचिव अशोक करंगुटकर, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार सतीश कदम, किशोर साठे, मधुकर पराडकर, अमोद उसपकर, संजय परब, किरण खानोलकर, रवी परब, प्रकाश मोरजकर, संदीप नाईक, विनायक सराफ, रणजीत सावंत, दीनानाथ बांदेकर, शिवसेवा संपर्कप्रमुख राजू नाईक, भाई देऊलकर, नगरसेवक विलास जाधव, आबा गवस, डी. के. सावंत, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

या कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी दीपक केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या पर्यटनाअंतर्गत सर्वागीण विकासासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. तसेच चांदा ते बांदा योजनेतून पर्यटनासाठी ३५ कोटी, क्वॉयर उद्योग, बांबू उद्योग, हस्तकला उद्योग करण्यात येणार आहे. बांदाजवळील कास गावात बजाज उद्योगामार्फत बजाज फूड पार्क प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच मुंबई विद्यापीठाअंतर्गत पर्यटन शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात येतील असे ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सागरी पर्यटन, कृषी ग्रामीण पर्यटन, स्वदेश पर्यटन अशा विविध उपक्रमातून या आर्थिक वर्षांत पर्यटनाचा विकास साधला जाणार आहे. तसेच कृषी-फलोद्यान, मत्स्यउद्योग अशा माध्यमातून जिल्हा विकास होईल असे केसरकर म्हणाले.

मुंबईतील चाकरमानी एकत्रित आले, त्यांनी व्हिजन सिंधुदुर्ग संस्था निर्माण केली. या ज्येष्ठांनी संस्था स्थापन करून आपल्या अनुभवातून आपल्या भागाच्या विकासासाठी झोकून देण्याचा विचार स्वागतार्ह आहे, असे दीपक केसरकर म्हणाले. उद्योजक अनंत भालेकर यांनी स्वागत केले. व्हिजनचे कार्याध्यक्ष बाळासाहेब परुळेकर यांनी प्रास्ताविक तर रणजीत सावंत यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डी. के. सावंत, दीनानाथ बांदेकर, महेश कुमठेकर यांचे कौतुक करण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Planning for sindhudurg tourism development says deepak kesarkar
First published on: 27-09-2016 at 01:57 IST