scorecardresearch

आषाढी एकदशीला एक झाड लावावे…त्यात पांडुरंगाला पाहावे : सयाजी शिंदे

यंदा वारीला न येऊ शकणाऱ्या लाखो वारकऱ्यांना श्री विठ्ठलरुपी वृक्षाची लागवड करण्याचे केले आवाहन

-मंदार लोहोकरे

यंदा करोनामुळे मानाच्या पालख्या आणि मोजक्याच भाविकांना पंढरीची वारी करता येणार आहे. त्यामुळे राज्यातील भाविकांनी आपल्या अंगणात, दारात ,गावात, शेतात एक वृक्ष लावा आणि त्यात पांडूरंग पाहवा. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजेच १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता विठ्ठलरूपी वृक्षलागवड करावी असे आवाहन, सिनेअभिनेते आणि सह्याद्री वनराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे यांनी केले आहे.

दरवर्षी साधारणपणे १५ लाख भाविक आषाढी वारीसाठी पंढरीत दाखल होतात. त्यामुळे यंदा १५ लाख वृक्षांच्या लागवडीचा संकल्प करावा, असे ते म्हणाले. तसेच, यंदा कोरोनामुळे आषाढी वारी चुकली असली तरी या वारीची आठवण म्हणून ” वृक्षवल्ली आम्हा सोयरे ” या संत वचनाप्रमाणे राज्यातील प्रत्येक वारकऱ्यांनी आषाढी एकादशी दिवशी सकाळी ११ वाजता आपल्या घरासमोर विठ्ठलरुपी वृक्षाची लागवड करुन श्री विठ्ठल दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सयाजी शिंदे यांनी केले.

सह्याद्री वनराई संस्था, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्यावतीने श्री क्षेत्र देहू – आळंदी ते पंढरपूर या पालखी तळावर सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ शिवाजी मोरे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे अध्यक्ष अॅड विकास ढगे पाटील, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मधुकर मोरे, सोहळा प्रमुख अजित मोरे, महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांच्यासह अनेक गावचे सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

सयाजी शिंदे म्हणाले की, वारकऱ्यांना यंदा करोनामुळे आषाढी वारीला येता आले नाही याचे दु:ख आहे. हे दु:ख विसरायचे असेल तर जो वृक्ष आपणाला जगण्याची उर्जा देतो. त्याची आपल्या दारात, शेतात, गावात लागवड करुन त्याची श्री पांडुरंग परमात्मा म्हणून पूजा करा व जसे रोज तुळशीला पाणी घालता तसे त्या वृक्षाला घाला. झाडे लावताना वड, पिंपळ, लिंब, चिंच, उंबर, आंबा, आवळा, जांभूळ याच देशी झाडांची लागवड करा असे ते म्हणाले .

आषाढी वारीला विविध संतांच्या पालख्यांच्या माध्यमातून राज्यभरातून येणाऱ्या सुमारे १५ लाख वारकऱ्यांनी आपआपल्या गावी १५ लाख झाडे लावण्याचा विठ्ठल चरणी संकल्प केल्याचे हरीत वारीचे प्रणेते व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे विश्वस्थ शिवाजी मोरे यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सुमारे ४५० दिंड्या आहेत.या दिंडीतील वारकऱ्यांनी आपल्या गावी तर पालखी मुक्कामाच्या गावात पालखी तळावर वृक्ष लागवड करावी असे आवाहन अॅड विकास ढगे पाटील यांनी केले.  संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ३२९ दिंड्या आहेत. या दिंडीकऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी संपर्क केला आहे. प्रत्येक दिंडी प्रमुखांनी एकादशीच्या दिवशी वृक्ष लागवड करावी, असे आवाहन अध्यक्ष मधूकर मोरे यांनी केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Plant a tree on ashadi ekadashi see the form of panduranga in it sayaji shinde msr