मराठा बांधवांना माझी विनंती आहे की आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करु नये. माझी सरकारलाही विनंती आहे आहे की आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घ्या. राज्य सरकारला शेवटचं सांगतो की त्यांनी मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावं. कुणीही उग्र आंदोलन करु नका अशी विनंती मी मराठा बांधवांना करतो आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यातूनच हे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे.

२९ ऑक्टोबरपासून दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन

२९ ऑक्टोबरपासून साखळी उपोषण सुरु केलं जाणार आहेच. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी हे उपोषण नक्की करा. वयोवृद्ध माणसांचा विचार करा. माझी तरुणांना आणखी एक विनंती आहे की २९ तारखेपासून प्रत्येक गावात तरुण आंदोलकांनी बेमुदत उपोषण सुरु करा. तसं झालं तर सरकारला आपल्या प्रश्नाची दखल घ्यावीच लागेल. तसंच आपल्या गावात कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला येऊ द्यायचं नाही आणि कुणाच्या दारात आपणही जायचं नाही. आधी मराठा आरक्षण मिळालं पाहिजे त्यानंतर नेत्यांना येऊ द्या असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. दुसऱ्या टप्प्यातलं आंदोलन २९ तारखेपासून सुरु होईल. या आंदोलनात कुणाला काही झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारची असणार आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. आमरण उपोषणाठी २९ पासून अनेक लोक बसणार आहेत. यात कुणाचा जीव गेला तर ती संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल. सगळ्यांनी शांततेत उपोषण सुरु करावं अशी मी विनंती करतो आहे असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

३१ ऑक्टोबरपासून आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरु होईल

तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन ३१ ऑक्टोबरपासून सुरु होईल. आरक्षण मिळणार आहे मात्र कुणी आत्महत्या करु नका असंही आवाहन मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. माझ्या पोटात चार दिवसांपासून पाणीही नाही. मला त्रास होतो आहे. मात्र त्यापेक्षा मराठा समाजाला होणारा त्रास खूप मोठा आहे. माझ्या त्रासापेक्षा माझ्या समाजाचा, पोरांचा त्रास जास्त होतो आहे. माझ्या समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी मी उपोषणाला बसलो आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठा समाजासाठी पुन्हा आंदोलन सुरु झाल्यापासून महाराष्ट्र सरकारतर्फे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी कुणीही आपल्याशी संपर्क केलेला नाही. त्यांना कदाचित मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर वाटत नसावा. त्यांना आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करुन उत्तर देऊ असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सरकारकडून काही निरोप येतो आहे का? त्याची आम्ही वाट पाहू असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.