बीड : बीड-अहिल्यानगर रेल्वे धावण्याचा विषय श्रेय वादाचा नाही. या प्रकल्पात जमीन अधिग्रहण सर्वांत अवघड काम होते. पण आम्ही ते केलं. मराठवाड्याच्या रेल्वेसाठी गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिली. अमळनेर (भा) ते बीड या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन आणि बीड ते अहिल्यानगर रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्याच्या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी झेंडा दाखवत रेल्वेचे उद्घाटन केले.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी, ज्यांनी आम्हाला दिशा दाखवली, त्या गोपीनाथ मुंडेंना मी वंदन करतो. असे म्हणतच भाषणाला सुरुवात केली. मंचावर उपस्थित आमदार धनंजय मुंडे यांचा उल्लेख ‘आमचे मित्र’ असा करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज बीडच्या जनतेकरिता स्वप्नपूर्तीचा योग आहे. रेल्वे पोहोचते तिथे विकासही पोहोचतो. केशर काकू क्षीरसागर, गोपीनाथ मुंडे यांनी या रेल्वेचे स्वप्न पाहिले होते. पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं. आम्ही गोपीनाथ मुंडे यांना ही रेल्वे अर्पण करत आहोत. या वेळी खासदार बजरंग सोनवणे व खासदार रजनीताई पाटील यांची उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्र्यांनी बीडकरांचे कान टोचले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात मात्र बीडकरांचे कान टोचले. बीडकरांनी या रेल्वे मार्गाला वेळ का लागला याचं परीक्षण केलं पाहिजे. केशर काकू क्षीरसागरांपासून बजरंग सोनवणेंपर्यंत इतके खासदार झाल्यानंतर ही रेल्वे पुढे जात आहे. समाजात तेढ निर्माण करू नका. माणुसकी दाखवा. राजकीय दबाव आणला तर मी आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस, असे दोन योग आज आले आहेत. हा रेल्वे मार्ग दोन जिल्ह्यांना जोडणारा नाही तर लाखो लोकांच्या स्वप्नाला जोडणारा आहे, असे अजित पवार म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले ‘मुंडे का सपना पुरा करूंगा’

कष्टाळू आणि कर्तृत्वान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच ही रेल्वे सुरू होत आहे. केशर काकू क्षीरसागरांपासून बजरंग सोनवणेंपर्यंत मनापासून या रेल्वेसाठी सर्वांची भूमिका महत्त्वाची राहिली. प्रीतम मुंडे या खासदार असताना त्यांचीही भूमिका या रेल्वेसाठी महत्त्वाची होती. गोपीनाथ मुंडे खासदार असताना या रेल्वेसाठी सर्वाधिक ४५० कोटींचा निधी आला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या रेल्वे मार्गासाठी दोन हजार २९२ कोटी रुपयांचा निधी दिला. ‘गोपीनाथ मुंडे का ये सपना पुरा करुंगा’ असे पंतप्रधान मोदी यांनी भाषणात सांगितल्याची आठवण मंत्री पंकजा मुंडे यांनी करून दिली.