लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. भाजपाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली. “काँग्रेसने जाहीरनामा नाही तर माफीनामा प्रसिद्ध करायला हवा”, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

“सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाची गुढी आपल्याला नक्कीच उभारायची आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी नक्कीच हॅट्रीक करतील. ४ जूनला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर असाच जल्लोष आपल्याला करायचा आहे. कारण पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार ही गॅरंटी १४० कोटी देशवाशीयांनी घेतली आहे. आज देशामध्ये मोदींची गॅरंटी चालते. मात्र, इतर लोकांच्या गॅरंटीवर कोणाचाही भरवसा नाही. काँग्रेसचे सरकार असताना आपला देश कोणत्या परिस्थितीत होता हे सर्वांना माहिती आहे. दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, दंगली, भ्रष्ट्राचार, अशा अनेक गोष्टींनी आपला देश ग्रासला होता. पण गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात विकास होत आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा : “…तेव्हा बाळासाहेब ठाकरे स्वत: काँग्रेसविरोधात उभे राहिले होते”, पंतप्रधान मोदींकडून काश्मीरचा उल्लेख करत हल्लाबोल!

“काँग्रेसच्या ५० वर्षांच्या काळात जी विकासकामे झाले नाही त्यापेक्षा जास्त विकासकामे गेल्या १० वर्षात झाले आहेत. आता काँग्रेसने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. खऱ्या अर्थाने ५० वर्षात देशाला तुम्ही कुठे घेऊन गेलात? याबाबत ५० वर्षाचा हिशेब आपण त्यांना मागितला पाहिजे. त्यामुळे काँग्रेसला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा अधिकार नाही. काँग्रेसने जाहीरनामा नाही तर माफीनामा जाहीर करायला हवा. कारण देशाला खड्ड्यात घालण्याचे काम काँग्रेसने केले आहे”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.