PM Narendra Modi on Sanjay Raut Health: शिवसेना (ठाकरे) पक्षाची मुलुख मैदान तोफ समजले जाणारे खासदार संजय राऊत हे दोन महिने आता शांत राहणार आहेत. रोज सकाळी माध्यमांना बाईट देऊन विविध आरोप करत राजकीय वातावरण तापवणारे संजय राऊत सध्या एका आजाराने ग्रस्त झाले असून उपचारासाठी ते दोन महिने विश्रांती घेणार आहेत. याची घोषणा त्यांनी स्वतःहून सोशल मीडियावर केली होती. त्यांचे पत्र शेअर करत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी एक्सवर आज दुपारी एक पत्र शेअर केले होते. त्यात त्यांनी म्हटले की, “आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले. पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन.”

“वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन, असेही संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींनी काय म्हटले?

संजय राऊत यांच्या पत्राची पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी म्हटले, “संजय राऊतजी, तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.”

दरम्यान पंतप्रधान मोदींनी काळजी व्यक्त केल्यानंतर संजय राऊत यांनीही यावर प्रतिसाद दिला आहे. “आदरणीय पंतप्रधानजी आपले धन्यवाद! माझे कुटुंब आपले आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र!”, अशा शब्दात राऊत यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.

२०१९ साली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडली. यानंतर भाजपा आणि संजय राऊत यांच्याकडून रोज सकाळी माध्यमांत बाईट देऊन भूमिका मांडण्याचा सिलसिला सुरू झाला. संजय राऊत यांनी तेव्हापासून जवळपास रोजच सकाळी माध्यमांना बाईट देण्याचा दिनक्रम सुरू केला. भाजपाने त्यांच्या पत्रकार परिषदांना ‘सकाळचा भोंगा’ असे नावही दिले होते.

sanjay-raut-health-tweet-political-leaders
संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत कोण काय काय म्हणाले?

भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षाच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्याकडे दुर्लक्ष करा असे वारंवार सांगितले असले तरी संजय राऊत नेहमीच महायुतीवर तुटून पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर त्यांच्या टीकेला उत्तरही देत नसत. आमच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊतांवर बोलतील, असे ते नेहमी माध्यमांना सांगायचे.

दोन ते तीन महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंना संजय राऊत यांची कमतरता नक्कीच भासेल, अशी भावना व्यक्त विविध नेत्यांनी व्यक्त केली आहे.