अहिल्यानगर: रांगोळीच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावण्यामागे नेमका उद्देश काय होता, त्यामागे कोणाचा हात आहे का, याचा शोध घेतला जाईल, असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज मंगळवारी सांगितले. दरम्यान काल, सोमवारी सकाळी घडलेल्या रांगोळीच्या घटनेकडे ‘गुडमॉर्निंग’ पथकाच्या झालेल्या दुर्लक्षाचीही चौकशी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरात काल घडलेली तणावाची घटना तसेच आज होणारी एमआयएमचे खासदार अससूद्दीन ओवेसी यांची सभा या पार्श्वभूमीवर पोलीस महानिरीक्षक कराळे नगरमध्ये थांबून होते. आज त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यावेळी उपस्थित होते. कराळे यांनी शहरातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती घेतली व तपासाच्या सूचना दिल्या.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावाच्या घटना वाढत आहेत का, या प्रश्नावर त्यांनी या संदर्भातही चौकशी केली जाईल असे सांगितले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातून चिथावणीखोर वक्तव्यात वाढ होत आहे, या संदर्भात पोलिसांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या तसेच आगामी सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरात गेल्या काही दिवसात घडलेल्या तणावाच्या घटनांमध्ये पोलिसांनी मुळापर्यंत तपास केला नाही, या अक्षेपावर त्यांनी, जिल्हा पोलीस दलास सूचना केली जाईल असेही स्पष्ट केले. रांगोळीच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्याच्या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी संग्राम आसाराम रासकर (रा. बारातोटी कारंजा, माळीवाडा, नगर) याला काल अटक केली. त्याला उद्या, बुधवारपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. दरम्यान कालच्या तणावाची घटना तसेच आज होणारी एमआयएमचे खासदार अससूद्दीन ओवेसी यांची सभा या पार्श्वभूमीवर पोलीस महानिरीक्षक कराळे नगरमध्ये थांबून होते. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाज माध्यमातून चिथावणीखोर वक्तव्यात वाढ होत आहे, या संदर्भात पोलिसांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या तसेच आगामी सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.