प्रबोध देशपांडे 

अकोला : ‘आमच्याकडे किट नाही, मास्क नाही, सॅनिटायझर नाही. आपण मुख्यमंत्री असते , तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती’ अशी व्यथा वाशिम जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्याने थेट माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडली. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे.

पाहा व्हिडीओ


नागपूरहून मुंबईला जात असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी वाशिम जिल्ह्यातील जऊळका पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या किन्हीराजा येथील शिवाजी हायस्कूलजवळ खंडेराव मुंढे यांच्या विनंतीवरून पाच मिनिटं थांबले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची विचारपूस करून प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले. आपल्या गाडीत बसून पुढील प्रवासासाठी ते निघत असतांना त्या ठिकाणी तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने संवाद साधू शकतो का? अशी विचारणा केली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बोला असे म्हटताच त्या पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागरिकांच्या संरक्षणासाठी दिवसरात्र तैनात असतांना करोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेली किट्स, मास्क किंवा सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले नाही, असे त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितले. ‘तुम्ही मुख्यमंत्री असता, तर ही वेळ आली नसती, असेही तो पोलीस कर्मचारी म्हणाला. त्या कर्मचाऱ्याने पोलिसांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस कर्मचाऱ्याचे म्हणणे ऐकून घेतले. यानिमित्ताने राज्यातील पोलिसांच्या समस्या चव्हाट्यावर आल्या आहेत. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.