कुंभमेळ्याच्या कालावधीत साधू-महंत आणि भाविकांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असून पोलीस यंत्रणेने त्यादृष्टीने सूक्ष्म नियोजन केले आहे. हा महोत्सव शांततेत व आनंदात पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे उभारण्यात आलेल्या ‘कमांड अ‍ॅण्ड कंट्रोल सेंटर’चे उद्घाटन शनिवारी महाजन यांच्या हस्ते झाले. नव्याने स्थापित करण्यात आलेल्या सार्वजनिक ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे त्यांनी नाशिककरांशी संवाद साधला. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक जिल्ह्य़ाला जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी उपलब्ध झाली आहे. नाशिकचा विकास व सौंदर्याचे दर्शन भाविकांना घडणार आहे. या काळात भाविक व जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात असून प्रत्येक नागरिकाने शहराचे रक्षक व सेवकाची भूमिका पार पाडल्यास वाईट प्रवृत्तींना पायबंद बसून उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा साजरा होईल, असे महाजन यांनी नमूद केले. येत्या वर्षभरात शहरातील सीसी टीव्ही कॅमेरा यंत्रणा कायमस्वरूपी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या कार्यक्रमानंतर महाजन यांनी रामकुंड परिसरास भेट देऊन विकासकामांची पाहणी केली. पुरोहित संघाच्या प्रतिनिधींकडून ध्वजारोहण कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती घेतली.