कराड : माझ्या एका शब्दप्रयोगावरून सध्या आंदोलन करत राजकारण होत आहे. मात्र त्या शब्दामागची माझी भूमिका समजून घ्यावी असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्व आरोपींची नुकतीच निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निकालानंतर या खटल्याच्या निमित्ताने वापरलेला ‘ भगवा दहशतवाद ‘ हा शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला. याचाच संदर्भ घेत चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘ सनातन दहशदवाद ‘ असा शब्द वापरला. ‘ भगव्या’ पाठोपाठ आता ‘सनातन दहशदवाद ‘ या शब्दावरून राज्यभर पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुद्ध निषेध आंदोलन सुरू झाले आहे. यालाच उत्तर देताना चव्हाण यांनी वरील मत या प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

या पत्रकात आपली भूमिका मांडताना चव्हाण म्हणाले, की आंदोलन करण्याचा प्रत्येकाला हक्क, अधिकार आहे. पण, मुद्दा नेमका काय आहे हे समजून घ्यायला हवं. माझा शब्दप्रयोग, त्यामागील संदर्भ लक्षात घ्यायला हवेत. दहशतवादाला जात, धर्म, रंग नसतो अशीच माझीही भूमिका असून कुणीही चुकीचा अर्थ काढू नये. काहीजण सोयीने याचा अर्थ काढून आंदोलन करत आहेत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून सध्या राज्यभर राजकारण केले जात आहे.

दहशतवाद हा दहशतवाद आहे, त्याला धर्माचे लेबल लावू नये असेच माझेही मत असल्याचे चव्हाण यांनी या पत्रकात व्यक्त केले आहे. मुंबई लोकलमधील स्फोट आणि मालेगाव स्फोट अशा दोन्हींचे निकाल एकाच वेळेस आले आहेत. या दोन्ही खटल्याबाबत वरिष्ठ न्यायालयात दाद मागायला हवी. तपास यंत्रणांवर राजकीय दबाव आहे का याचे उत्तर शोधायला हवे, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.