प्रदूषणामुळे चंद्रपूर जिल्ह्य़ातील फ्लोराइडयुक्त पाण्याचा प्रश्न अजूनही मिटलेला नाही. राजकारण्यांकडून दिली जाणारी आश्वासने, विविध उपाय योजूनही देशातील सहाव्या क्रमांकाच्या प्रदूषित अशी ओळख असलेल्या चंद्रपूरच्या समस्यांमध्ये फरक पडलेला नाही. हवा, पाणी सारेच प्रदूषित असल्याने आजारपणाचे प्रमाणही अधिक आहे.

औद्योगिक नगरी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ात ३७२ गावे फ्लोराईडयुक्त  पाण्याने बाधित असून पुण्याच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संचालकांकडे असलेल्या नोंदीनुसार ४८८ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. फ्लोराइडयुक्त विषारी पाणी पिणाऱ्या हजारो लोकांना फ्लुरोसिस व अस्थिव्यंगासह इतर आजारांची लागण झालेली आहे. चंद्रपुरात  पिण्याच्या पाण्याची समस्या फार पूर्वीपासून आहे. चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, राजुरा, बल्लारपूर या प्रमुख तालुक्यांना वर्धा व इरई नद्यांवरून पाणीपुरवठा होत असला तरी बहुसंख्य तालुके व गावांना अजूनही अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. या पाण्यासोबतच या जिल्ह्य़ात प्रामुख्याने फ्लोराइडयुक्त पाणीपुरवठा होणारी ३७२ गावे असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयातून समोर आली आहे. विशेष म्हणजे, तीन दिवसांपूर्वीच भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या संचालकांच्या नोंदीनुसार या जिल्ह्य़ात ४८८ गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत असून १६४ गावांमध्ये मोठय़ा प्रमाणात फ्लोराइडयुक्त पाणीपुरवठा होत आहे. या १६४ गावांमध्ये ७८ गावांची लोकसंख्या एक हजारांवर असून ८६ गावांची लोकसंख्या एक हजाराहून कमी आहे, तर ५७ गावांत नळयोजनांद्वारे शुद्ध पाणी दिले जात आहे. पाच गावे जलस्वराज्यमध्ये घेण्यात आली असून २४ गावांचे सर्वेक्षण करून आराखडा तयार केला जात आहे. जिल्ह्य़ातील १५ तालुक्यांपैकी वरोरा, चिमूर, मूल, सावली, भद्रावती व चंद्रपूर. हे सहा तालुके फ्लोराइडयुक्त आहेत. बल्लारपूर नऊ, चंद्रपूर ३७, भद्रावती ३७, पोंभूर्णा १८, गोंडपिंपरी ९, राजुरा २४, कोरपना १२, जिवती २, चिमूर ५८, वरोरा ६०, मूल ४२, सावली ५६, सिंदेवाही ६, नागभीड व ब्रम्हपुरी प्रत्येकी एक अशी ३७२ गावे फ्लोराइडयुक्त आहेत. सावली, भद्रावती व वरोरा या तालुक्यांमध्ये तर फ्लोराइडयुक्त पाण्यामुळे पिढय़ान् पिढय़ा फ्लोरोसिस आजार अनेकांना जडल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र शासन किंवा जिल्हा प्रशासनाने आजही यावर कोणतीच ठोस उपाययोजना केलेली नाही.

आजारांचे प्रमाण वाढले

फ्लोराइडयुक्त अशुद्ध पाणी प्यायल्यावर सुरुवातीला पोटाचे विकार होतात. त्यानंतर फ्लुरोसिस रोगाची लागण होऊन हाडे ठिसूळ होत जातात. दात पिवळे पडणे, हातापायांची बोटे वाकणे, पाय वाकडा होणे, दातांमध्ये कीड लागणे, डोळे आत खोलवर जाणे, केस गळणे, तसेच चेहऱ्यांवर सुरकुत्या पडून लवकरच वृद्धत्वाकडे झुकणे आदी आजारांची लागण होते. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणाच्या माध्यमातून जिल्हाभरातील १ हजार ७५४ गावांचे सर्वेक्षण केल्यावर त्यात ३७२ गावे फ्लोराइडयुक्त दिसून आली. गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून डी-फ्लोरिडेशन प्लान्टच्या माध्यमातून वॉटर फिल्टर गावात बसविण्यात आले आहेत. मात्र बहुसंख्य गावात ही योजनाच बंद आहे. त्यामुळे नाइलाजास्तव लोकांना फ्लोराइडयुक्त पाणीच प्यावे लागत आहे. त्याचा परिणाम बहुसंख्य लोकांना अपंगत्वही आलेले आहे. जागतिक बँकेच्या वतीने जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत गावात शुद्ध पाणीपुरवठय़ाची योजना असली तरी पाहिजे, पण त्यात यश न आल्याने अशुद्ध पाण्यावरच तहान भागविली जात आहे.

चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वित्त खाते तर स्थानिक खासदार हंसराज अहिर हे केंद्रात गृहराज्यमंत्री असल्याने जिल्ह्य़ाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. पण गेल्या दोन वर्षांत या आघाडीवर तरी फारसा काही फरक पडलेला नाही.

ठळक मुद्दे

  • गावांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी जिल्ह्य़ात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, भारत निर्माण कार्यक्रम, महाजल कार्यक्रम व जलस्वराज्य अभियान, अशा चार योजना राबविल्या जात आहेत. ३७२ फ्लोराइडयुक्त गावांपैकी ३२५ गावांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजलअंतर्गत नळ पाणीपुरवठा सुरू आहे, तर १८ गावांमध्ये जलस्वराज्य टप्पा दोनअंतर्गत कामे प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
  • नळयोजना पुरवठा नसलेली आणि फ्लोराइडयुक्त पाणी मिळत असलेली ४७ गावे आहेत. यात सर्वाधिक वरोरा व सावली तालुक्यांत अनुक्रमे १२ व ११ गावे सावली तालुक्यात असून चंद्रपूर ८, भद्रावती २, पोंभूर्णा ५, गोंडपिंपरी १, कोरपना २, चिमूर १, मूल २ व सिंदेवाही ३ गावांचा समावेश आहेत, तर गुणवत्ता बाधित ५ व पाणीटंचाईची ६ गावे आहेत.
  • सर्वाधिक फ्लोराइडयुक्त गावांमध्ये चरूर, कचराळा, बेलोरा, चोरगाव, हिंगणाळा, अंतूर्ला, चिखली, आलेवाही नवेगाव, गांगलवाडी, जानाळा, कोसंबी, मोरवाही, मोरवाही चेक, बापूनगर, बेलगाव, दाबगाव, जनकापूर, उसरपार चेक, घोट या २५ गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या सर्व गावांमध्ये फ्लोराइडची मात्रा ही १.५ पीपीएम इतकी आहे.
  • पाण्याची गुणवत्ता तपासणीसाठी जिल्ह्य़ात सात ठिकाणी पाणी गुणवत्ता प्रयोगशाळा आहेत. यात वरोरा, भद्रावती, सावली, गोंडपिंपरी, सिंदेवाही व ब्रह्मपुरीचा समावेश आहे, तर जिल्हा मुख्यालयात चंद्रपूर येथे एक प्रयोगशाळा आहे.
  • गावा गावात शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे म्हणून जलस्वराज्य प्रकल्प टप्पा १ व टप्पा २, असे दोन कार्यक्रम राबविण्यात आले. मात्र या दोन्ही कार्यक्रमांना पाहिजे तसे यश न मिळाल्याने बहुसंख्य गावे अजूनही अशुद्ध व फ्लोराइडयुक्त पाणीच पित आहेत. अशुद्ध पेयजल व फ्लोराइडयुक्त पाण्याचा अहवाल जागतिक बँकेच्या बेलापूर येथील कार्यालयााला यापूर्वी पाठविण्यात आलेला आहे. मात्र अजूनही शुद्ध पाणी मिळत नसल्याची ओरड गावकरी करीत आहेत.

संपूर्ण जिल्हा फ्लोराइडमुक्त व्हावा, यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. यवतमाळ जिल्ह्य़ात मंगी कोलामपूर येथे सर्वप्रथम फ्लोराइडयुक्त पाणी मिळाले होते. त्यानंतर चंद्रपूरमध्येही मोठय़ा प्रमाणात फ्लोराइडयुक्त पाण्याची गावे मिळाली आहेत. सध्या नीरी व युनिसेफच्या माध्यमातून सर्व फ्लोराइडयुक्त पाण्याचे नमुने तपासण्यात आलेले आहेत. पर्यायी व्यवस्थापन म्हणून रेनवॉटर हार्वेस्टिंग केले. जेथे समस्या मोठी आहे अशा गावात छोटे फ्लोराइडमुक्त युनिट ४० ते ५० लावण्यात आले. पाण्यात फ्लोराइडचे प्रमाण १.५ पीपीएमपेक्षा अधिक असेल, तर शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे याबद्दल गावागावात जनजागृती करण्यात आली, तसेच स्रोतबाधित गावे, पाणी गुणवत्ता कार्यक्रम राबविण्यात येऊन नळयोजना कार्यान्वित केल्या व बहुतांश गावात नळयोजना प्रस्तावित असून या पद्धतीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

विश्वास वालदे, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा, चंद्रपूर