शक्तिप्रदर्शनाच्या हेतूने घेण्यात येणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांना  गर्दी जमविण्यासाठी राजकीय पक्षांनी सध्या ‘सैराट’ चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्या लोकप्रियतेचा खुबीने वापर करण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तरुणाईला वेड लावणाऱ्या चित्रपटातील या ‘आर्ची’ला राज्यभरातून कार्यक्रमांसाठी आवताण येत आहेत.  राजकीय कार्यक्रमांसाठी भरमसाठ गोष्टींवर खर्च करण्यापेक्षा या अभिनेत्रीला बोलावले, की काम होत आहे, हे नेत्यांनी हेरल्यामुळे  सध्या जागोजागी ‘आर्ची’चे दर्शन घडू लागले आहे.

नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी राजकीय मेळावे, कार्यक्रमांना वेग आला आहे. या कार्यक्रमांसाठी गर्दी जमवण्यासाठी विविध शक्कली लढविल्या जात आहेत.  गेल्या काही वर्षांपासून  राजकीय कार्यक्रमांना गर्दी जमविण्यासाठी पैशाचा वापर मोठय़ा प्रमाणात करावा लागतो. पैसे खर्च करूनही गर्दी जमतेच असे नाही. यंदा त्यावर पर्याय म्हणून अनेक राजकीय नेत्यांनी ‘आर्ची’च्या लोकप्रियतेचा पद्धतशीरपणे वापर करून घेण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर, उस्मानाबादपाठोपाठ सांगली जिल्ह्य़ात झालेले सर्व कार्यक्रम हे असेच राजकीय हेतूने प्रेरित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न

  • दरम्यान, या गर्दीमुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण होऊ लागले आहेत. चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. कवठेमहांकाळ येथे उत्साही तरुणाईला आवर घालण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला, इस्लामपुरात भरपावसात आर्चीच्या दर्शनासाठी तरुणाई उतावीळ झाली होती, तर विटय़ात राज्य मार्गावरील वाहतूक चार तास खोळंबली होती.
  • ‘सराट’ चित्रपटाच्या यशानंतर देशभरामध्ये अकलूजच्या िरकू राजगुरू हिचा बोलबाला झाला. या शाळकरी तरुणीच्या अंगरक्षकांच्या संख्येपासून तिला पाहण्यासाठी जमणाऱ्या गर्दीच्या चर्चा घरोघरी रंगवून सांगितल्या जाऊ लागल्या.
  • अबालवृद्धांना झपाटणाऱ्या रिंकूच्या या लोकप्रियतेचा वापर करतच गेल्या दोन महिन्यांत सोलापूर, उस्मानाबादपाठोपाठ सांगली जिल्ह्य़ातही कवठेमहांकाळ, इस्लामपूर आणि विटा आदी ठिकाणी जाहीर कार्यक्रम झाले.
  • हे सर्व कार्यक्रम कुठल्या ना कुठल्या राजकीय नेत्यांचे होते. या प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमास आर्ची येणार असे काही दिवस आधीच जाहीर केल्यामुळे गर्दी जमली होती.  आर्चीच्या ‘दर्शना’ला आलेल्या जनसमुदायासमोर नेत्यांना आपल्या प्रचाराचा हेतू साध्य करता येत आहे.