सांगली : कुपवाड औद्योगिक केंद्रासह सांगली, मिरज शहरात चार वीज उपकेंद्र लवकरच उभारण्यात येणार असून यामुळे शहरातील नागरिकांना अधिक चांगल्या दर्जाची वीजसेवा उपलब्ध होईल, अशी माहिती राज्य वीज मंडळाच्या स्वतंत्र संचालिका नीता केळकर यांनी दिली. पत्रकार बैठकीत श्रीमती केळकर यांनी ही माहिती दिली. यावेळी सांगली मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता अमित बोकील, सांगली शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक रमेश आरवाडे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी केळकर म्हणाल्या, सांगली शहरातील स्फूर्ती चौक ते आलदर चौक या दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया ही महावितरणच्या जागा हस्तांतरणासाठी प्रलंबित होती. या जागेच्या बदल्यात महानगरपालिका महावितरणला चार पर्यायी ठिकाणी जागा देणार आहे. यामुळे शिंदे मळा (ऊर्मिला नगर), कुंभार मळा (वानलेसवाडी), गणी मळा (मिरज) येथे उपकेंद्र उभारणार आहेत.
तसेच मिरज शहरात बस करिता ई-चार्जिंग स्टेशनसाठी महानगरपालिका महावितरणला जागा उपलब्ध करून देणार आहे. यामुळे स्फूर्ती चौक ते आलदर चौक दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाचा विषय मार्गी लागण्याबरोबरच दोन्ही शहरातील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार वीज सेवा मिळण्यास मदत होणार आहे. तसेच सांगली-मिरज शहरातील वीज खांब स्थलांतर करण्याकरिता जिल्हा विकास निधीतून १ कोटी मंजूर होत आहेत.
कुपवाड एमआयडीसी येथेही उपकेंद्र उभारण्याच्या दृष्टीने महावितरण व एमआयडीसी यांच्यात जागा हस्तांतरणाचा विषय लवकरच मार्गी लागणार असून महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या संचालक मंडळाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. येथे उपकेंद्र उभारल्याने कुपवाड एमआयडीसीमधील औद्योगिक ग्राहकांना वाढीव वीजभार देणे तसेच नवीन उद्योगांना वीज जोडणी देणे शक्य होणार आहे. यामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग येऊन रोजगार निर्मिती होणार आहे.
औद्योगिक वसाहतीत वीज पुरवठा काही वेळा कमी दाबाने होतो. यांचा उत्पादन क्षमतेवर परिणाम होत असल्याने अखंडित व योग्य दाबाने वीज पुरवठा व्हावा अशी उद्योजकांची मागणी आहे. आता नवीन वीज उपकेंद्र होणार आहे. यामुळे अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा होण्यातील अडथळा दूर होणार आहे. जिल्ह्यात १७ सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले असून यातून ४७ हजार ६३७ शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. तर या प्रकल्पातून ११४ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. यामुळे सांगली जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आहे. जिल्ह्यात अजून १८ प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर असून यातून १७९ मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट आहे.