राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (१० जून) दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तसेच इतर वरिष्ठ नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवली आहे. आगामी निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात लढणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रफुल्ल पटेल म्हणाले, मला अशी जबाबदारी मिळणं काही नवीन नाही. मी खूप वर्षांपासून पवार साहेबांबरोबर राष्ट्रीय पातळीवर काम करतोय. पक्षाने आजवर जी जबाबदारी दिली ती मी पार पाडत आलो आहे. माझ्यासाठी आता पदोन्नती काही नवीन गोष्ट नाही. ते एबीपी माझाशी बोलत होते.

प्रफुल्ल पटेल यांना यावेळी पक्षाचा पुढील आव्हानांविषयी विचारण्यात आलं. त्यावर पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणं हे आमचं पहिलं आव्हान असेल.खरंतर ही सर्वच नेत्यांची जबाबदारी असेल. नागालँडमध्ये आमच्या पक्षाला मान्यता मिळाली आहे. अशा आणखी दोन तीन राज्यांमध्ये आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणणं आणि मतांची टक्केवारी वाढवणं आणणं हे आमचं प्रमुख आव्हान असेल. त्या दृष्टीने आम्हाला काम करावं लागेल.

हे ही वाचा >> राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळल्यानंतर ती परत रद्द केली जाणं ही आम्हाला शोभणारी गोष्ट नाही. आम्हालाही याचं दुःख आहे परंतु ठीक आहे, राजकारण म्हटलं की, उतार चढाव होत असतात. आज उतार असेल पण परत चढावही दिसेल, प्रगतीचे दिवस दिसणार आहेत.