लोकसभा निवडणुकीपूर्वीची शेवटी ‘लढाई’ समजल्या जाणाऱ्या चार राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांनी भाजपाचं बळ आणखी वाढवलं आहे. तर, काँग्रेसला उत्तर भारतातून हद्दपार केलं आहे. काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ताबदल घडवून आणत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “चार राज्यांच्या निकालाचं विश्लेषण करण्यास अजूनही वेळ आहे. भाजपाचा विजय झाला, हे निश्चित आहे. पण, भाजपाच्या विजयाचे बारकावे निवडणूक आयोगानं संपूर्ण माहिती दिल्यानंतर करता येईल.”

इंडिया आघाडीत काँग्रेसची वाटाघाटी करण्याची ताकद कमी होईल का? पत्रकाराच्या प्रश्नावर प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं, “काँग्रेसची राजकीय युती फक्त लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्याबरोबर होती. ममता बॅनर्जी यांच्याबरोबर युतीची चर्चा होणार होती. त्यामुळे काँग्रेसची ताकद कमी होईल, असं म्हणता येणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार राज्यांच्या निकालानंतर तुम्ही इंडिया आघाडी किंवा काँग्रेसबरोबर जाण्यास इच्छुक आहात का? असा प्रश्न विचारल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “आम्ही तर अगोदरपासून इंडिया आघाडीत जाण्यास इच्छूक आहे. पण, आम्हाला घेण्यास कुणी तयार नाही, हेही आम्हाला कळतंय. तरीही आम्ही इंडिया आघाडीबरोबर जाण्यास तयार आहोत.”