बापाचे छत्र बालपणीच हरवलेले रामदास आठवले आज दिल्लीच्या गादीचे मानकरी ठरले. हाता-तोंडाची गाठ पडत नव्हती, आई हौसाबाई दुसऱ्याच्या बांधाला रोजगार करीत कसेतरी पोट भरत होती. या नित्याच्या लढाईपेक्षा मुंबई जवळ करणारे रामदास बंडू आठवले आज दिल्लीचे मंत्री झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगली-मिरजेत जल्लोष केला.

खा. आठवले यांचे मूळ गाव कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी. या ढालेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत त्यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले. वडिलांचे छत्र बालपणीच हरपल्याने आई हौसाबाई यांनी मोलमजुरी करून त्यांना वाढवले. पुढे हे दुष्काळी गाव सोडत त्यांच्या आईने माहेर असलेल्या तासगाव तालुक्यातील सावळज गाठले. तिथे आठवले यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. माध्यमिक शिक्षणानंतर पोटाची आबाळ थांबवण्यासाठी मुंबई गाठली.

मुंबईत दलित पँथरशी जवळीक निर्माण झाली आणि चळवळ अंगाअंगात भिनली. संघर्ष हा निसर्गाकडूनच मिळालेला. त्याच्या जोरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेत चळवळीला बळ मिळत गेले. कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार होत गेले. या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच राजकीय क्षेत्रात नाव मिळाले.

मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या संघर्षांत अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. गावागावांत कार्यकत्रे साथीदार मिळाले. पक्षाची, आपल्या गटाची त्यांनी बांधणी केली. आमदार, खासदार आणि पुढे आज केंद्रीय मंत्री म्हणून संधी मिळाली.

आठवले यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सांगलीत राजवाडा चौक, शास्त्री चौक, मिरजेच्या महाराणा प्रताप चौकात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत साखर वाटून गावाकडचा माणूस दिल्लीला मंत्री झाल्याचा आनंद साजरा केला. यामध्ये रिपाइंचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश दुधगावकर, शहराध्यक्ष संजय िशदे, संतोष खांडेकर, रोहित शिवशरण, मनोज गाडे, नदीम मगदूम, शिवाजी वाघमारे, अरुण आठवले यांनी सांगलीच्या राजवाडा चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत जल्लोष केला.

महाराष्ट्रातील मंत्र्यांची संख्या सातवर

  • मोदींच्या तिसऱ्या फेरबदलाने महाराष्ट्रातील मंत्र्यांची संख्या सातवर  गेली आहे. शिवसेनेचा तिढा संपविल्यास ही संख्या आणखी एक-दोनने वाढण्याची शक्यता.
  • मंत्रिमंडळाची संख्या ७९ वर. कायद्यानुसार, कमाल मर्यादा ८२ची असल्याने फक्त तीन जागा रिक्त.
  • सर्वाधिक भर दलितांवर. १९पकी पाच चेहरे दलित. त्यापाठोपाठ दोन आदिवासी, दोन महिला आणि दोन अल्पसंख्याकांचा (एम. जे. अकबर, एम. एस. अहलुवालिया) समावेश.
  • राज्यांमध्ये स्वाभाविकपणे उत्तर प्रदेश आणि गुजरातवर भर. या दोन्ही राज्यांतून प्रत्येकी तिघे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, मध्य प्रदेशाला (प्रत्येकी दोघे) स्थान. दहा राज्यांना प्रतिनिधित्व.
  • उत्तर प्रदेशामध्ये जातींचे समीकरण जुळविण्याचा प्रयत्न. अनुप्रिया पटेल (ओबीसी), कृष्णा राज (दलित), महेंद्रनाथ पांडे (ब्राह्मण) यांना स्थान.
  • राजस्थानातून चौघांचा समावेश; पण अर्धचंद्र मिळालेल्यांमध्ये राजस्थानचे दोघे असल्याने एकूण संख्या तीन राहणार.
  • समाविष्ट झालेले चौघेही राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे िशदेविरोधी गटातील.

’ पटेलांच्या आरक्षण आंदोलनाचा धसका घेऊन पुरुषोत्तम रूपाला या पटेल समाजातील बडय़ा नेत्याचा समावेश. रूपाला हे मोदींचे निकटवर्तीय मानले जातात.