छत्रपती संभाजीनगर : माजलगाव मतदारसंघातील वडवणी येथील भाजप नेते राजाभाऊ मुंडे व त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांनी तीन दिवसांपूर्वी मुंबई येथे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये येण्यास उत्सुक असल्याचे जाहीर केले. ही घोषणा करताना धनंजय मुंडे यांची मात्र गैरहजेरी होती. धनंजय मुंडे यांच्या ऐवजी प्रकाश सोळंके यांनी हा प्रवेश घडवून आणल्याने त्यांची चर्चा माजलगाव मतदारसंघात होत आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे जिल्ह्याच्या राष्ट्रवादीचे नेतृत्व असल्याचे मानले जाते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये या प्रवेशांची घोषणा करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी चार दिवसांपूर्वी ओबीसी नेत्याला पक्ष नेतृत्वाकडून पाठबळ दिले जात असून, दुसरीकडे मराठा नेत्यांना मात्र कॅबिनेट मंत्री पदापासून दूर ठेवले जात असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी आमदार सोळंके यांनी आपल्या मतदारसंघातील भाजपमधील ओबीसी पिता-पुत्र नेत्यांना गळाला लावले. पक्षांतर्गत विरोधक धनंजय मुंडे याच वेळी पंकजा मुंडे आणि भाजपालाही हा धक्का मानला जात आहे.

आमदार सोळंके यांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये माजलगाव मतदारसंघातील ११ जिल्हा परिषदच्या गट कार्यक्षेत्रावर राष्ट्रवादीचा वरचष्मा ठेवला होता. आता पुन्हा एकदा ती ताकद पक्षीय पातळीवर दाखवून देण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा दावा केला जात आहे.

राजाभाऊ मुंडे व धनंजय मुंडे यांच्यामध्ये फारसे सख्य नव्हते. राजाभाऊ मुंडे भाजपमध्ये सक्रिय असले तरी त्यांचे अलीकडच्या काळात पंकजा मुंडे यांच्याशी फारसे पटत नसल्याची चर्चा होती. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजाभाऊ मुंडे यांनी वडवणीचे नगरपंचायतचे नगराध्यक्ष तथा आपले चिरंजीव बाबरी मुंडे यांच्यासह प्रकाश सोळंके यांचे नेतृत्व स्वीकारण्याचे ठरवले आहे.

बीड जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना एका मोठ्या घोटाळ्यात राजाभाऊ मुंडे यांचे नाव चर्चेत आले होते. गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय अशी त्यांची प्रतिमा होती. मागील ३५ वर्षांपासून ते भाजपमध्ये सक्रिय होते. राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांनी प्रकाश सोळंके यांच्या विरोधात विधानसभा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, तेव्हा मुंडे यांची उमेदवारी प्रकाश सोळंकेंच्या पथ्यावरच पडणार, अशी चर्चा होती.

वडवणी तालुक्यातील महत्त्वाचे ओबीसी नेते म्हणून राजाभाऊ व बाबरी मुंडे यांची ओळख असून, राजाभाऊ यांच्या पत्नी व मुलगा बाबरी हे वडवणी नगरपंचायतचे अध्यक्ष राहिलेले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंडे पिता पुत्र सत्तेतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाची कास सोडून देत प्रकाश सोळंके यांचे नेतृत्व स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माजलगाव धारूर व वडवणी ही तीन तालुके येत असून, यामध्ये ११ जिल्हा परिषद गट व २२ च्या आसपास पंचायत समितीचे गण आहेत. या सर्व जागांवर राष्ट्रवादी अथवा महायुतीचे पूर्णपणे वर्चस्व दाखवण्यासाठी राष्ट्रवादीकडून जुळवाजुळव सुरू झाली आहे. आता भाजपकडे माजलगावमध्ये नेतृत्व करणारा चेहरा नसल्याचे चित्र आहे.

भाजप पक्ष राष्ट्रीय स्तरावरचा आहे. तशी पक्षाला विशिष्ट तालुक्यासाठी चेहऱ्याची गरज वाटत नसली तरी संपूर्ण जिल्ह्यासाठी पंकजा मुंडे याच प्रमुख चेहरा आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या जातील. – शंकर देशमुख, बीड जिल्हाध्यक्ष, भाजप.

आपण व वडील राजाभाऊ मुंडे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत येत्या ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहोत. प्रवेश सोहळा वडवणीमध्येच होणार आहे. – बाबरी मुंडे