लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे. अशात भाजपा या पक्षात इनकमिंग वाढलं आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आणि त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. त्याचप्रमाणे प्रणिती शिंदे या भाजपात जातील याच्या चर्चा गेल्या महिन्यात रंगल्या होत्या. सुशीलकुमार शिंदे देखील भाजपात जातील अशा चर्चा होती. कारण याबाबत त्यांनीच एक गौप्यस्फोट केला होता. आता भाजपा प्रवेशाच्या सगळ्या चर्चांवर प्रणिती शिंदेंनी मौन सोडलं आहे.

१७ जानेवारीला काय म्हणाले होते सुशीलकुमार शिंदे

सोलापूरमधील अक्कलकोट तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या स्नेहसंमेलन सोहळ्यात सुशीलकुमार शिंदे म्हणाले होते, “भाजपाचे काही नेते मला आणि प्रणितीला भाजपामध्ये या म्हणून सांगत होते. पण ते कसं शक्य आहे. ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो, जिथे आमचे बालपण गेले, जिथे आम्ही वाढलो. आता मी ८३ वर्षांचा झालो, आता कसं दुसऱ्याशी घरोबा करणार? हे शक्य नाही. प्रणितीबद्दल तुम्हाला माहितीच आहे, ती पक्ष बदलण्याच्या भानगडीत पडणार नाही.”

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या?

“सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाची मी एकमेव आमदार आहे. बाकी सगळे आमदार भाजपाचे आहेत. भाजपाचे आमदार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत नाहीत. तुमची म्हणजेच लोकांची बाजू विधानसभेत मांडणार कोण? कारण भाजपाचे आमदार हुकूमशाही सरकारला घाबरतात. लोकांची बाजू विधानसभेत मांडायला राहिलं कोण? माझ्या नावाने अफवा पसरवत आहेत की मी भाजपात जाणार. मात्र मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या रक्तात काँग्रेस आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी ईडीला घाबरत नाही

माझ्या रक्तात काँग्रेस आहे कारण मी सर्वधर्मसमभाव या संकल्पनेवर विश्वास ठेवते. मी सामान्य माणसांवर, ग्रामस्थांवर विश्वास ठेवते. मी लोकशाहीवर विश्वास ठेवते त्यामुळे मी काँग्रेसमध्ये आहे. मी ईडीला घाबरत नाही कारण माझ्याकडे कारखाना नाही, माझ्याकडे संस्था नाहीत. मी दिलखुलासपणे भाजपाच्या विरोधात बोलणार. मी ईडीला भीत नाही. माझ्याकडे कारखाना नाही, संस्था नाही. नशीब शिंदे साहेब त्यात पडले नाहीत. त्यामुळे मला ईडीची कसली भीती मी दिलखुलासपणे भाजप विरुद्ध बोलणार असल्याचा निर्धार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. तसंच भाजपासह जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.