सोलापूर सिव्हिल रूग्णालयातील औषध तुटवड्यावरून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाली आहे. “औषधांचं वाटप आरोग्य शिबिरांमध्ये केलं जातं,” असा आरोप प्रणिती शिंदेंनी केला. त्यावर “तुम्हाला आरोग्य शिबिराचा त्रास होणं स्वाभाविक आहे,” असं प्रत्युत्तर आरोग्यमंत्र्यांनी प्रणिती शिंदेंना दिलं. तर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आरोग्यमंत्र्यांचे कान टोचले आहेत.

नेमकं काय घडलं?

प्रणिती शिंदे म्हणाल्या, “हिमोग्लोबीन कमी झाल्यावर लोहाची ( आयर्न ) औषधं घ्यावी लागतात. पण, सोलापूर आणि सगळीकडे आरोग्य शिबिरांची संख्या वाढली आहे. आजार नसतानाही लोह आणि साखरेच्या ( शुगर ) गोळ्यांचं वाटप शिबिरांमध्ये केलं जातं. त्यामुळे सिव्हिल रूग्णालयात गोळ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरोदर महिलांना लोहाच्या गोळ्या उपलब्ध होत नाहीत. मुदत संपलेल्या गोळ्यांचही वाटप शिबिरांमध्ये केलं.”

हेही वाचा : “…म्हणून विधानसभा अध्यक्ष राजीनामा देऊ शकतात”, रोहित पवारांचं मोठं विधान

“सीटी स्कॅन नाही, गोळ्या नाहीत”

“जनतेला व्हेंटिलेटर ठेवण्यात आलं आहे. सिव्हिल रूग्णालयातील सीटी स्कॅन मशिन बंद आहे. रूग्णालयात खासगी ठिकाणी सीटी स्कॅनसाठी पाठवण्यात येते. सीटी स्कॅन नाही, गोळ्या नाहीत, मग आरोग्य कर्मचाऱ्यांचा वापर फक्त शिबिरांसाठीच करणार आहात का?” असा संतप्त संवाल प्रणिती शिंदेंनी उपस्थित केला.

“प्रणिती शिंदेंचं एकही पत्र मला मिळालं नाही”

यावर तानाजी सावंतांनी म्हटलं, “सिव्हिल रूग्णालये वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येतात. आम्ही जनतेची सेवा करत असल्यानं तुम्हाला आरोग्य शिबिराचा त्रास होणं साहजिक आहे. शासकीय विभागातील कुठलीही औषधे शिबिरांमध्ये वापरली जात नाही. सेवाभागी संस्थांकडून घेऊन औषधांचं वाटप केलं जातं. तसेच, सिव्हिल रूग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याबाबत प्रणिती शिंदेंचं एकही पत्र मला मिळालं नाही.”

हेही वाचा : ड्रग्सचा व्यवसाय इन्स्टाग्रामवरून, तर युपीआयद्वारे व्यवहार; देवेंद्र फडणवीसांची सभागृहात धक्कादायक माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रणिती शिंदेंनी मांडलेल्या प्रश्नाबाबत उचित कारवाई करावी”

पत्र मिळालं नसल्याच्या वक्तव्यावरून राहुल नार्वेकरांनी तानाजी सावंतांचे कान टोचले. “सरकारकडून काम अपेक्षित असते. तेव्हा, विधानसभा सदस्यांनी पत्र दिलं, तरच काम करावे, हे अपेक्षित नाही. प्रणिती शिंदेंनी मांडलेल्या प्रश्नाबाबत उचित कारवाई करावी,” असे निर्देश नार्वेकरांनी तानाजी सावंतांना दिले.
तर, “माहिती घेऊन तातडीने कारवाई केली जाईल,” असं तानाजी सावंतांनी सांगितलं.