सावंतवाडी : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सुरक्षित आणि त्रासमुक्त प्रवासाची सोय करण्यासाठी, अमेरिकेतून माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ई-मेलद्वारे पत्र पाठवून महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.येत्या २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी मुंबई आणि एमएमआरडीए परिसरातून लाखो लोक कोकणात आपल्या गावी जातात. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, ज्यावर भोसले यांनी लक्ष वेधले आहे.
भोसले यांनी काही प्रमुख समस्या निदर्शनास आणल्या आहेत. मुंबई-गोवा रोड (NH66) वर पळस्पे फाटा येथील डी-मार्टजवळचे रस्ते अत्यंत खराब झाले असून, मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे मोठ्या आणि लहान वाहनांना प्रवास करणे कठीण झाले आहे. पर्यायी मार्ग असलेल्या अटल सेतू ते चिरनेर मार्गावर ढिगारे साचल्याने वाहतूक कोंडी होते. तसेच, डोलवी ते नागोठणे रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने प्रवास धोकादायक बनला आहे.
यासोबतच, कोलाड ते लोणेरे रस्ता एकेरी असल्याने गणेशोत्सवादरम्यान प्रवासाला ५ ते ६ तास लागतात. यासाठी पर्यायी मार्ग म्हणून पाली ते माणगाव रस्त्याचा वापर करता येईल, पण त्यासाठी योग्य मार्गदर्शक फलक लावणे आवश्यक आहे. चिपळूण येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे दररोज वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याशिवाय, संगमेश्वर ते लांजा दरम्यानच्या रस्त्याची स्थितीही खराब आहे.
मुंबई-बंगळूरू रोड (NH48) आणि बोरघाट येथील वाहतूक कोंडीमुळे अमृतांजन पुलापासून बोगद्यापर्यंतचा प्रवास नेहमीच खोळंबतो. तसेच, प्रत्येक १०० किलोमीटरवर आणि वाहतूक कोंडी असलेल्या ठिकाणी महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांना या समस्यांवर तातडीने लक्ष देऊन रस्ते दुरुस्ती, वाहतूक व्यवस्थापन आणि इतर आवश्यक सुविधा पुरवण्याचे निर्देश देण्याची विनंती पत्राद्वारे केली आहे. या समस्यांवर तातडीने उपाययोजना न केल्यास गणेशभक्तांचा कोकण प्रवास अत्यंत त्रासदायक आणि असुरक्षित होऊ शकतो, अशी चिंता भोसले यांनी व्यक्त केली आहे.