सोलापूर : येत्या १० जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटनिवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होत असून, या वेळी सुमारे दोन लाख भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. दुसरीकडे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३८ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जात आहे.
श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार मानल्या गेलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी मोठ्या संख्येने भाविक अक्कलकोटमध्ये येतात. सर्व भाविकांच्या दर्शनासाठी नेटके नियोजन करण्यात येत असल्याचे वटवृक्ष देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी सांगितले.
भाविकांच्या दर्शनरांगेत दक्षिण महाद्वार ते मंदिरापर्यंत पत्राशेड उभारण्यात आले आहे. मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरती झाल्यानंतर मंदिराचे पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते गुरुपूजन होईल. मंदिराचे महाद्वार गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे दोन वाजता उघडण्यात येणार असून, त्या दिवशी नित्यनेमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. सकाळी १०.३० वाजता महानैवेद्य आरती होईल. दुपारी १२ ते ३ पर्यंत मंदिर समितीच्या मैंदर्गी-गाणगापूर रस्त्यावरील भक्त निवासामध्ये सर्व स्वामिभक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३८ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक संकीर्तन महोत्सव संपन्न होत असून, यात राधा मंगेशकर, बेला शेंडे, आदेश बांदेकर, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सर्व आघाडीचे कलावंत, ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर, इतिहास विषयाचे अभ्यासक नितीन बानगुडे-पाटील आदींनी हजेरी लावली आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक लाखापेक्षा जास्त भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले आणि प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी ही माहिती दिली. सायंकाळी श्रींची पालखी, रथोत्सव वाजतगाजत निघणार आहे. यात अनेक मान्यवर सहभागी होणार असल्याचे अमोलराजे भोसले यांनी सांगितले.