या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा आपल्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी, त्यासाठी आपण राजीनामा देऊ, असा प्रस्ताव नवनिर्वाचित दोन आमदारांनी दाखवला आहे. पाथर्डी मतदारसंघातील भाजपच्या आमदार मोनिका राजीव राजळे यांच्या पाठोपाठ गंगाखेड मतदारसंघातील रासपचे रत्नाकर गुट्टे यांनीही पंकजा मुंडे यांच्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊन जागा सोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तरी त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी समर्थकांमधून होऊ लागली आहे. आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पंकजा यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष आहे.

परळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी ३० हजारांपेक्षाही अधिकच्या मताधिक्य़ाने पराभव केला. राज्यात भाजप महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्या पंकजा यांना सत्तेत स्थान मिळणार का? यावरुन समर्थकांत अस्वस्थता निर्माण झालेली असतानाच पाथर्डीच्या नवनिर्वाचित आमदार मोनिका राजळे यांनी शुक्रवारी पंकजा यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची तयारी दर्शवली.

पाथर्डी मतदारसंघात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक घेऊन पंकजा यांनी सत्तेत जावे, असा प्रस्ताव त्यांनी ठेवला आहे. तर कारागृहात असताना निवडून आलेले गंगाखेड मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे नवनिर्वाचित आमदार रत्नाकर गुट्टे यांनीही पंकजा मुंडे यांच्यासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

विजयी मिरवणुकीनंतर गुट्टे यांचे जावई रासपचे युवा प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी परभणी येथे जाऊन गुट्टे यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी पंकजा यांच्या पराभवाबद्दल खेद व्यक्त करुन आमदारकीचा राजीनामा देऊन या ठिकाणी पंकजा यांना निवडून आणण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती फड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. तर आष्टी मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार भीमराव धोंडे यांनी शनिवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पंकजा या ओबीसीच्या नेत्या असून त्यांच्यामुळे अनेक मतदारसंघात भाजपला यश मिळाले आहे.

परळी मतदारसंघात पराभव झाला असला तरी त्यांचा मंत्रीमंडळात समावेश करून पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे. इतर काही आमदारांनीही याच पध्दतीने मागणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparations for pankaja munde to resign from two mlas abn
First published on: 28-10-2019 at 01:31 IST