हिंगोली: ‘ गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळेच्या विरोधात उपोषणाचा इशारा देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याच्या डोक्यावर आता चौकशीची टांगती तलवार लटकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षक संघटनांनी या प्रकरणात थेट शिक्षण मंत्र्याशी संपर्क केला. दादा भुसे यांनीही संघटनांची बैठक घेतली. दबावानंतर शिक्षणाधिकाऱ्यांनी उपोषण करण्याचा निर्णय बदलल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अंतुले नगर शाळेतील मुख्याध्यापक शैक्षणिक कामकाजात सहकार्य करीत नसल्याचा आरोप करीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रशांत दिग्रसकर यांनी शाळेसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यामुळे संपूर्ण शिक्षण विभागात खळबळ उडाली. परंतु शिक्षक संघटनेच्या हस्तक्षेपानंतर दिग्रसकर यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. ११ऑक्टोबररोजी ते उपोषणाला बसणार होते. मुख्याध्यापक शैक्षणिक कामात सहकार्य करीत नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वृद्धीच्या कामात अडथळे येत आहेत. वारंवार नोटिसा देऊनही फारसा उपयोग होत नसल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. काही तासांतच शिक्षक संघटनांनी या विरोधात जोरदार हालचाली सुरू केल्या. मुंबईत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत ८ ऑक्टोबर रोजी शिक्षक संघटनांची बैठक पार पडली.
या बैठकीत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब मारणे, संभाजीराव थोरात, बाळासाहेब झावरे,आदी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी यांनी केवळ ऑनलाईन माहितीवेळेत न दिल्याच्या कारणावरून शिक्षकांवर दबाव आणत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. उपोषणाच्या इशाऱ्यामुळे शिक्षक वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला. आता शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांचीवरच चौकशीची टांगती तलवार लटकली आहे. ‘राज्य शासनाच्या ‘निपुण महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, हा माझा हेतू होता. शिक्षकांकडूनआता आवश्यक माहिती सादर केली असे सांगण्यात आल्याने उपोषण करणार नाही असे दिग्रसकर यांनी सांगितले.