सोलापूर : यंदा मे महिन्यातच जोरदार पाऊस झाल्यामुळे आणि येत्या काही दिवसांत पुन्हा मोठा पाऊस पडण्याची शक्यता गृहीत धरून पंढरपूरच्या यंदाच्या आषाढी वारीत सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरल्यास मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागू नये याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी उपाय म्हणून मोठ्या प्रमाणावर मुरूमीकरण केले जात असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.
मुरूमीकरणासाठी ७५ हजार घनमीटर मुरूम वापरण्यात येत आहे. गतवर्षी आषाढी यात्रेच्या काळात पंढरपूर व आसपासच्या परिसरात चिखल होऊ नये म्हणून ३० हजार घनमीटर मुरूम वापरण्यात आला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा यात्रा काळात जास्त पावसाची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून चिखलाचे साम्राज्य टाळण्यासाठी जास्त प्रमाणात मुरूमीकरण केले जात आहे. माळशिरससह अन्य काही भागात हे काम पूर्ण झाले आहे. उद्या, मंगळवारी सायंकाळपर्यंत संपूर्ण मुरूमीकरण पूर्ण होईल, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना सांगितले.
आषाढी यात्रेसाठी केल्या जाणाऱ्या पायाभूत सोयीसुविधांसह सुरक्षितता इत्यादी बाबींची तपशीलवार माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पालखी मार्गासह पंढरपुरात ठिकठिकाणी मिळून ११ हजार फिरती व तात्पुरती शौचालये उभारण्यात येत आहेत. शौचालयांची वेळोवेळी स्वच्छता करण्यासाठी पुरेशा मनुष्यबळासह अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. परिसरात पावसामुळे चिखल वाढला, तर शौचालयांपर्यंत जाणे आणि त्यांचा वापर टाळला जाण्याची शक्यता असते. म्हणून चिखल टाळणे खूप गरजेचे आहे.
यात्रेत पालखी मार्गावर आणि पंढरपुरात ९४ ठिकाणी वारकऱ्यांच्या निवास आणि विश्रांतीसाठी जलरोधक मंडपांची उभारणी केली जात आहे. गतवर्षी ३.१५ लाख चौरस फूट आकाराच्या जलरोधक मंडपांची उभारणी झाली होती. यंदा त्यापेक्षा दुप्पट म्हणजे ६.१२ लाख चौरस फूट आकाराच्या जलरोधक मंडपांची सोय केली आहे. वारकरी व भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय उपचार केंद्रांसह अतिदक्षता विभाग उभारणार येत आहेत. त्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोलापूरसह पंढरपूर, अकलूज, बार्शी आदी शाखांनी सहकार्याचा हात पुढे केला आहे. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, बिनतारी दळणवळण यंत्रणा, चंद्रभागा नदीच्या ठिकाणी नोंदणीकृत २३० होड्यांची आणि ६५० जीवरक्षक जाकिटांची सोय करण्यात आला आहे. चेंगराचेंगरी होऊ शकते अशी संवेदनशील ठिकाणे निश्चित करून तेथे पुरेशी दक्षता घेतली जात असल्याची माहितीही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.