अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून रखडलेले प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश अखेर ऑनलाइन पद्धतीने प्राप्त झाले आहेत. बदल्यांचे आदेश यंदा ऑगस्टअखेरीस काढण्यात आले आहेत. तसेच बदल्या झालेल्या शिक्षकांच्या संख्येतही यंदा मोठी वाढ झाली आहे. यंदा जिल्ह्यातील ४ हजार ७२० शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही माहिती उपलब्ध झाली. मात्र, बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप बदली ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. बदल्यांचे प्राप्त झालेले आदेश हे एक ते तीन संवर्गातील आहेत. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यापूर्वी मे अखेरीपर्यंत पार पडत होत्या. परंतु, यंदा बदल्या होण्यास ऑगस्टअखेर उजाडला आहे. बदल्यांच्या संवर्ग एकमधील अपंग प्रमाणपत्रसह अन्य सवलतींचा फायदा घेतलेल्या शिक्षकांच्या चौकशीची प्रक्रिया अद्याप संपलेली नाही. यासंदर्भात बदल्यांमध्ये सवलतीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांच्या तपासणीचा गटविकास अधिकाऱ्यांकडून शिक्षण विभागाला अहवाल प्राप्त झालेला नाही. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच संवर्ग एकबाबत निर्णय होणार आहे.
प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया गेल्या दीड महिन्यांपासून सुरू आहे. या प्रक्रियेत संवर्ग एकमधील ८६३ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये अपंग प्रमाणपत्र असणारे, दुर्धर आजाराने पीडित, घटस्फोटीत, अपंग विद्यार्थ्यांचे पालक असणारे शिक्षक आदींचा समावेश आहे. ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार संबंधित शिक्षकांची तालुका पातळीवरील गटविकास अधिकाऱ्यांकडून पडताळणी सुरू आहे.
संवर्ग दोनमधील ३७४, अवघड क्षेत्रातील ३८८ व आता बदली पात्र असणाऱ्या ३ हजार ९५ शिक्षक अशा एकूण तिन्ही संवर्गातील ४ हजार ७२० शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून बदल्यांचे ऑनलाईन आदेश पाठवण्यात आले आहेत. मात्र, बदली ठिकाणी हजर होण्यासाठी पुन्हा स्वतंत्र आदेश काढावे लागणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.