ठाणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील काँग्रेसचे वर्चस्व वाढविण्यासाठी कुणबी सेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शनिवार, २३ नोव्हेंबर रोजी  वाडा येथे येणार आहेत. या वेळी शेतकरी व कष्टकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ठाणे जिल्ह्य़ात २४ विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्य़ातील काँग्रेसची ताकद जेमतेम आहे. विशेषकरून जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी मुख्यमंत्री काही छुप्या खेळी खेळत आहेत. याच खेळीचा एक भाग म्हणून ते कुणबी सेनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहणार असल्याचे समजते.
ग्रामीण भागात अनेक समस्या आहेत. या समस्यांच्या माध्यमातून अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचून काँग्रेसची जिल्ह्य़ातील ताकद वाढविण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत, म्हणूनच कुणबी सेनेच्या व्यासपीठाचा त्यांनी आधार घेतला असल्याचे सांगण्यात येते. आतापर्यंत  काँग्रेसचा जिल्ह्य़ातील हुजरेगिरी करणारा एक नेताच ठाणे जिल्ह्य़ातील काँग्रेसची ताकद वाढू नये आणि आपले वर्चस्व कमी होऊ नये यासाठी प्रयत्नशील असायचा, याची पूर्ण जाणीव नेत्यांना झाली आहे. त्या नेत्याला बाजूला ठेवून मुख्यमंत्री स्वत: या भागात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात येते.