दर्शन पास विक्रीबाबत सखोल तपासाची मागणी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंढरपूर : सनातनवर बंदी घालण्यासाठी २०११ मध्ये प्रस्ताव पाठविला होता, त्या वेळी पी. चिदंबरम हे केंद्रीय गृहमंत्री होते. याबाबत सुशीलकुमार शिंदे यांना काहीच माहिती नाही कारण ते नंतर केंद्रीय गृहमंत्री झाले, मात्र यानंतर बंदीचा प्रस्ताव का अडकला हे समजले नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

काँग्रेस पक्षाने भाजपा सरकार विरोधात सुरू केलेल्या संघर्ष यात्रेनिमित्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील आणि काँग्रेसचे नेते उपस्थित होते. सनातन बंदी प्रकरणी आ.चव्हाण पुढे बोलताना म्हणाले, की २०१४ मध्ये आम्ही १ हजार पानांची अधिक माहिती केंद्राकडे पाठवली होती.

दिल्लीत गृहखात्याचे २०० अधिकारी आहेत. तसेच त्या वेळी केंद्रीय सचिव असलेले आज ते केंद्रात मंत्री आहेत, त्यामुळे सचिव ,उपसचिव या पातळीवर प्रस्ताव कुठे दाबला गेला का, अशी शंका पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी व्यक्त केली.

तर धनगर समजाची राज्य सरकारने फसवणूक केल्याची टीका आ.चव्हाण यांनी केली. या बाबत ते म्हणाले, की राज्यामध्ये धनगड आहेत, असे मी कोणतेही पत्र दिले नाही. मात्र त्याबाबत अफवा पसरवून, माझ्या विरुद्ध धनगर समाजामध्ये गैरसमज करून देण्याचे काम होत आहे. जर तसे पत्र असेल तर मला दाखवावे असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांना केले. तसेच केंद्र सरकारकडून आरक्षणासंदर्भात निर्णय घेतला जात असल्याचे माहीत असताना देखील, ८ दिवसांत धनगर समाजाला आरक्षण देऊ  म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची फसवणूक केली असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.

टोळीच्या मुळाशी कोण याचा शोध घ्या

येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन पास विक्री करण्याचे काम कोणी एकटा करू शकत नाही. या प्रकरणात मोठी सोनेरी टोळी असणार आहेम्.  या टोळीच्या मुळाशी कोण आहे. याचा शोध घेण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करावे, तसे न केल्यास सर्व वारकऱ्यांचा अपमान होईल. या प्रकरणी सखोल तपास करावा, अन्यथा विधिमंडळात प्रश्न उपस्थित करू, असे  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prithviraj chavan clarify about sanatan sanstha ban
First published on: 05-09-2018 at 01:07 IST