scorecardresearch

“कोश्यारींचा राजीनामा स्वीकारण्यास विलंब का?”; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

चव्हाण म्हणाले, राज्यपालांवर कुणीही कधी टीका, टिपणी करत नाही, त्यांच्यावर आक्षेप घेत नाही, पण त्याला हे राज्यपाल अपवाद ठरले.

Prithviraj Chavan criticizes the delay in accepting Bhagat Singh Koshyari's resignation
भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा स्वीकारण्यास होणाऱ्या विलंबावरुन पृथ्वीराच चव्हणांची टीका (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

महापुरुषांबद्दल बेजबाबदारपणे बोलणाऱ्या आणि संविधानिक अधिकारांवर गदा आणणाऱ्या वादग्रस्त अशा भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाची प्रतिष्ठा घालवली. मात्र, त्यांचा राजीनामा दीर्घकाळ का स्वीकारला नाही? असा प्रश्न करून, त्याचे उत्तर केंद्र सरकारला द्यावे लागेल अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

हेही वाचा- “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा भाजपाने कधी निषेध केला नाही”, जयंत पाटलांची टीका; म्हणाले, “त्यांना..”

भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपालपदाचा राजीनामा मंजूर झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते चव्हाण माध्यमाशी बोलत होते. ते म्हणाले, की राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त ठरलेली आहे. कोश्यारींना परत बोलवावं, त्यांचा राजीनामा घ्यावा अशी विरोधीपक्षांकडून अनेक वेळेला मागणी करण्यात आली. राज्यपाल हे पद पाहिलं तर घटनात्मक आहे. त्यांना स्वतःचे फार अधिकार नाहीत. हे संविधानिक पद आहे. आणि हे मान्य केलेतर राज्यपालांनी सरकारच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करणे अपेक्षित नाही. पण, कोश्यारी स्वतः यापूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री असल्याने सक्रीय राजकारणात होते. त्यामुळे ते सक्रीय राजकारणापासून बाहेर जावू शकले नाहीत. महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून येऊन देखील त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर गोंधळाची व वादग्रस्त विधाने करून स्वतःवर आक्षेप ओढावून घेतले. तसे पाहिले तर राज्यपालांवर कुणीही कधी टीका, टिपणी करत नाही, त्यांच्यावर आक्षेप घेत नाही, पण त्याला हे राज्यपाल अपवाद ठरले.

हेही वाचा- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; चर्चा मात्र उच्च न्यायालयाने दोनदा बजावलेल्या नोटीसची

महाराष्ट्रामधील अनेक महापुरुषांबद्दल सविस्तर माहिती न घेता कारण नसताना बेजबाबदार वक्तव्ये त्यांनी केली. आमच्या महाविकास विकास आघाडीच्या राज्य सरकारने ज्या १२ व्यक्तींना राज्यपालांनी विधानपरिषदेवर नेमावे म्हणून विनंती करून मंत्रिमंडळाचा ठराव पाठवला होता. त्यावर त्यांनी कार्यवाहीच केली नाही. त्यातून जवळपास १५ महिन्यांहून अधिक कालावधीत आमच्या संविधानिक अधिकारावर गदा आली. जेंव्हा महाविकास आघाडीचे सरकार जावून शिंदे सरकार स्थापन होत होते. त्यावेळीही कोश्यारींची राज्यपाल म्हणून वागणूक अत्यंत वादग्रस्त ठरली. त्यामुळे त्यांना वादात पडण्याची हौस होती का? सतत बातम्यांमध्ये आणि चर्चेत राहिले पाहिजे असे वाटत होते का? या साऱ्यांचा त्यांना हव्यास होता का? असे प्रश्न उपस्थित होतात. एकंदरच कोश्यारींनी राज्यपालपदाची प्रतिष्ठा नष्ट केल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागेल आणि त्यामुळेच त्यांचा हा राजीनामा स्वीकारण्यास विलंब का केला? याचे उत्तर केंद्रातील मोदी सरकारला द्यावे लागेल, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 17:44 IST