अमेरिकास्थित ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने अदाणी समुहाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात अदाणी समुहाने गैरव्यवहार आणि लबाडी केल्याचा आरोप केला. या अहवालावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत उद्योगपती गौतम अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर काँग्रेसने अदाणी प्रकरणावरून देशात भाजपा आणि पंतप्रधान मोदींविरोधात आंदोलन करत राळ उठवली होती. तसेच, याप्रकरणाच्या संयुक्त संसदीय चौकशीची ( जेपीसी ) मागणी केली होती.

पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘हिंडेनबर्ग रिसर्च’च्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जेपीसी चौकशीची गरज नसल्याचं म्हटलं होतं. त्यावरून बराच गदारोळ झाला. अशातच आता उद्योगपती गौतम अदाणी यांनी गुरुवार ( २० एप्रिल ) शरद पवार यांची भेट घेतल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा : “ही सैतानी साम्राज्याची सुरुवात, शिंदे सरकारने लक्षात ठेवावं की…”, ‘त्या’ प्रकरणावरून अमोल मिटकरींचा हल्लाबोल!

गौतम अदाणी आणि शरद पवार यांच्यात मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट झाली. दोघांत तब्बल २ तास चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, चर्चेचा तपशील अद्याप समोर आला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“शरद पवार आणि अदाणींचे जुने संबंध आहेत. पवारांचं सहकार्य घेण्यासाठी अदाणी भेटले असतील. पण, अदाणींबाबतचे आमचे प्रश्न काय आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे अदाणींनी नाहीतर पंतप्रधान मोदींनी दिली पाहिजेत. कारण, आरोप पंतप्रधान मोदींवर झाले आहेत,” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

हेही वाचा : “श्रीनिवास कुठे आहेत?” उद्धव ठाकरेंची गाडीतून उतरताच विचारणा; बाळासाहेब ठाकरे स्मारक बांधकाम पाहणीवेळी MMRDAचे चेअरमन गैरहजर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांनी अदाणी समुहात पैसे कोणाचे आहेत? असा प्रश्न विचारत मोंदीवर गंभीर आरोप केलेत. मात्र, याचं उत्तर देण्यात आलं नाही. अदाणींनी कंपन्या विकून पैसे उभे केल्याचं सांगितलं आहे. मग, बेनामी कंपन्यांच्या माध्यमांतून परदेशात का गुंतवणूक केली? भारतात का केली नाही?,” असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.