आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची इंडिया आघाडी मोर्चेबांधणी करत आहे. या मोर्चेबांधणीसाठी इंडिया आघाडीतले २८ पक्ष आज मुंबईत एकत्र येत आहेत. देशभरातील २८ पक्षांचे नेते, सहा राज्यांचे मुख्यमंत्री यांच्यासह राष्ट्रीय पातळीवरील अनेक मोठमोठे नेते इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या दोन दिवसीय (३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर) बैठकीसाठी येणार आहेत. देशात भाजपाप्रणित एनडीएचं सरकार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एनडीएचे प्रमुख नेते आहेत. आगामी लोकसभा निवडणूक एनडीए नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात लढणार आहे. तर इंडिया आघाडीचं नेतृत्व कोण करणार? किंवा इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार? याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेऊन इंडिया आघाडीची मोट बांधायला सुरुवात केली होती. तेव्हापासून नितीश कुमार या आघाडीचं नेतृत्व करतील असं बोललं जात होतं. परंतु, नितीश कुमार यांचं नाव आता मागे पडलं आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा हे राहुल गांधी असतील असं वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अलिकडेच केलं होतं. त्यापाठोपाठ दिल्लीचे मुख्यमत्री अरविंद केजरीवाल यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचीही उल्लेख ठाकरे गटाचे नेते करत आहेत. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी चतुर्वेदी म्हणाल्या, आज मुंबईत एक ऐतिहासिक कार्यक्रम होऊ घातला आहे. इंग्रजांविरोधात करो या मरो या आंदोलनाची सुरुवात मुबईतूनच झाली होती. अशीच एक घोषणा देत एकत्र आलेले सर्व पक्ष आणि आम्ही मिळून पुढे जाणार आहोत. देशात भाजपाचा भ्रष्टाचार सुरु आहे, त्याविरोधात आम्ही ही लढाई लढणार आहोत. ते या देशाचं ध्रुवीकरण करत आहेत. देशातल्या तरुणांविरोधात, शेतकऱ्यांविरोधात, महिलांविरोधात हे सरकार काम करत आहे, आमची लढाई या सरकारविरोधात आहे. जनतेच्या समर्थनाने २०२४ मध्ये आम्ही ही लढाई नक्कीच जिंकू.

हे ही वाचा >> “इंडिया’च्या बैठकांवर पैशांची उधळपट्टी”, भाजपाच्या टीकेवर आदित्य ठाकरे म्हणाले, “सुरत-गुवाहाटीचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांका चतुर्वेदी यांना यावेळी पत्रकारांनी विचारलं की, पंतप्रधानपदासाठी इंडिया आघाडीकडून कोणाचं नाव निश्चित झालं आहे का? यावर प्रियांका चतुर्वेदी म्हणल्या, पंतप्रधानपदासाठी खूप नावं पुढे येतील. परंतु, यापैकी तेच नाव निवडलं जाईल जी व्यक्ती सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाईल, जी व्यक्ती सर्वांशी सल्लामसलत करून निर्णय घेईल. जनतेला आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, आम्ही त्यावर खरे उतरू.