|| राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विदर्भातील सर्वच व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणाऱ्या व्याघ्रदर्शनामुळे पर्यटकांची संख्या सातत्याने वाढत होती. विशेषकरून ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र या वर्षी ही संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३८ हजार २६८ने पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. व्याघ्रप्रकल्पातील वाढलेल्या प्रवेश शुल्कामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे. मात्र त्याच वेळी काही व्याघ्रप्रकल्पात शुल्कवाढीमुळे पर्यटन कमी झाले असले तरीही महसुलात फारशी तूट जाणवली नाही. याउलट काही ठिकाणी महसुलात वाढ झालेली आढळून आली.

व्याघ्रप्रकल्पांचे प्रवेश शुल्क प्रचंड प्रमाणात वाढवण्यात आले. त्यामुळे या पर्यटनावर आता केवळ श्रीमंतांचीच मक्तेदारी राहिली आहे. दर केवळ प्रवेशाचे नाही तर जिप्सी, पर्यटक मार्गदर्शक शुल्काचे सुद्धा वाढले. त्याचाच फायदा घेत रिसॉर्टचालकांनी देखील त्यांचे दर वाढवले. यादरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमुळे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेशावरील र्निबधाचा फटकादेखील निसर्ग पर्यटनाला बसला. निसर्ग पर्यटन वाढले तर पर्यटक मार्गदर्शक, जिप्सीचालक, होम स्टे, रिसॉर्ट या ठिकाणी नोकरीच्या संधी वाढतात.  जंगलालगतच्या गावातील तरुणांना रोजगार मिळाला तर वनसंरक्षणात त्यांचा सहभाग वाढेल. मात्र पर्यटनच कमी झाल्यामुळे अनेकांच्या रोजगारावर मर्यादा आल्या. जिप्सीच्या फेऱ्या कमी झाल्यामुळे जिप्सीचालक, त्यातील पर्यटक मार्गदर्शक यांच्या उत्पन्नावर त्याचा फरक पडला. चार वर्षांपूर्वी उमरेड-करांडला अभयारण्यात ‘जय’नामक वाघाने देशीविदेशी पर्यटकांना आकर्षित केले होते. खेळाडूंपासून तर चित्रपट अभिनेत्यांपर्यंत सर्वच जण या अभयारण्यात या वाघाला पाहण्यासाठी येऊन गेले. त्यामुळे या अभयारण्याने देखील प्रवेशाचे दर वाढवले. दरम्यान, ज्या वाघाच्या भरवशावर पर्यटन वाढले तो वाघ गायब झाल्यानंतर पर्यटकांनी देखील पाठ फिरवली. परिणामी या अभयारण्यातील एक प्रवेशद्वार बंद करावे लागले.

आता इतर व्याघ्रप्रकल्पांमध्ये व्याघ्रदर्शन होऊनदेखील पर्यटकांची संख्या रोडावली आहे. कारण पर्यटनाचे दर प्रचंड वाढले आहेत. विदर्भातील ताडोबा-अंधारी, मेळघाट, पेंच, नवेगाव-नागझिरा आणि बोर या पाच व्याघ्रप्रकल्पांत २०१६-१७ या वर्षांत ३  लाख ८३ हजार ८१८ पर्यटकांनी भेट दिली होती. ती संख्या या वर्षी ३ लाख ४५ हजार ५५० वर आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ हजार ३६८ पर्यटक कमी झाले आहेत. पेंच व्याघ्रप्रकल्पात प्रवेश शुल्क आणि वाहन शुल्कात वाढ करण्यात आली. त्यामुळे २०१६-१७ च्या तुलनेत १३ हजार ४९३ पर्यटक कमी झाले.

मात्र प्रवेश शुल्कात केलेल्या भरमसाट वाढीमुळे व्याघ्रप्रकल्पाच्या महसुलात तूट जाणवली नाही. याउलट शुल्क वाढीमुळे २५ लाख ३७ हजार रुपयांचा महसूल वाढला. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाात देखील ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया असताना देखील नोंदणी होत नसल्याने आणि आता पर्यटकांच्या प्रवेशांवर र्निबधामुळे या ठिकाणीसुद्धा मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ११ हजार २६९ पर्यटक कमी झाले. त्यामुळे त्याचा फटका या व्याघ्रप्रकल्पाला बसला. मेळघाट व्याघ्रप्रकल्पात २०१६-१७च्या तुलनेत पर्यटकांची संख्या सात हजारांनी कमी झाली आहे. तर नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात सहा हजार पर्यटक या वर्षी कमी झाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Project tiger in maharashtra
First published on: 20-10-2018 at 01:57 IST