सांगली : अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध करण्यासाठी रविवारी सांगली-कोल्हापूर मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. उंची वाढीला विरोध करण्यासाठी प्रसंगी अलमट्टी धरणावरही धडक देण्याचा निर्धार सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील नेेते व कार्यकर्त्यांनी या वेळी दिला. बुधवारी या प्रश्नी बैठक घेण्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मान्य केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला असून, या उंचीवाढीमुळे सांगली, कोल्हापूरसह कृष्णाकाठ उद्ध्वस्त होण्याचा धोका संभवत असून, यामुळे कायम महापुराला सामोरे जाण्याची धास्ती राहणार आहे. त्यामुळे या उंचीवाढीला विरोध करण्यासाठी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय नेते पक्षभेद विसरून एकत्र आले आहेत. आज चक्का जाम आंदोलनासाठी सतेज पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश आवाडे, खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम, अरुण लाड आदींसह अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते.
आंदोलनामुळे सांगली व कोल्हापूर मार्गावरील रस्ते वाहतूक सुमारे चार तास खंडित झाली होती. चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने कोल्हापूरसाठी हरिपूर, कोथळी या मार्गाचा वापर करण्याचे आणि इचलकरंजीहून मिरजेस येण्या-जाण्यासाठी अर्जुनवाड या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते.आंदोलनाच्या ठिकाणी येणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अडवण्यात येत असल्याचा प्रकार झाल्याने संतप्त झालेल्या माजी मंत्री सतेज पाटलांनी थेट व्यासपीठावरून उतरत कार्यकर्त्यांना अडवल्याच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घातलेला घाट जीव गेला, तरी पूर्ण होऊ देणार नाही. वडनेरे समितीने दिलेला अहवाल चुकीचा असून, तो रद्द करा. पश्चिम महाराष्ट्राला या महापुराच्या विळख्यातून बाहेर काढा, राज्य आणि केंद्र सरकार यांनी एकत्रितपणे अलमट्टीच्या उंचीवाढीचा निर्णय हाणून पाडा, अशी एकमुखी मागणी सर्वपक्षीयांनी केली.पाटबंधारे विभागाने बुधवारी (दि. २१) मंत्रालयात पाटबंधारे मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक घेणार असल्याचे पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.