अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण उद्या गुरुवारी (२८ सप्टेंबर) रोजी साजरा होणार आहे. यामुळे गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करण्याचा पोलीस प्रशासनावर ताण येणार आहे. यामुळे महाराष्ट्र सरकारने शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती. राज्यात शांततेचे वातावरण असावे. तसेच पोलिसांना गर्दी तसेच मिरवणुकांचे नियोजन करता यावं. यासाठी २९ तारखेस सुट्टी देण्याची विनंती या संघटनेनं केली होती. या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान, आदींचा समावेश होता.

अनंत चतुर्दशीनिमित्त राज्याच्या विविध भागात गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिलादनिमित्त मिरवणुका काढण्यात येत असतात. दोन्ही सणांमुळे एकाच दिवशी निघणाऱ्या मिरवणुकांमुळे पोलीस यंत्रणांवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन २९ सप्टेंबरची सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेश विसर्जन मिरवणुका शिस्तबद्धपणे, शांततेत पार पाडाव्यात

अनंत चतुर्दशीनिमित्त गणरायाला आपण मनोभावे निरोप देऊ. विसर्जन मिरवणुकीतही नेहमीप्रमाणे शिस्त पाळावी आणि शांतता, सद्भावनेच्या वातावरणात गणेश विसर्जन पार पाडावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गणेशभक्तांना केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्र्यांकडून ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा

‘ईद-ए-मिलादचे उत्सव पर्व सौहार्द-सलोखा घेऊन येईल. यातून परस्परांतील आदर-प्रेमभाव आणि स्नेह वाढीस लागावा,अशी मनोकामना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा दिल्या. ‘प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला त्याग आणि प्रेमाचा संदेश दिला. त्यांचे जीवन हाच एक मोठा संदेश आहे. त्यातून प्रेरणा घेऊन आपण परस्पर आदर-प्रेमभाव वाढीस लावण्याचा प्रयत्न करूया,’ असेही आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले.