Gautami Patil : पुणे शहरातील नवले पुलाजवळ३० सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने रिक्षाला जोरात धडक दिली.त्या घटनेमध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.तर त्या रिक्षाचालकावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर त्या अपघाताच्या घटनेमध्ये नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या मालकीची कार असल्याची माहिती पोलीस तपासातसमोर आली. ज्यानंतर गौतमीला अटक करण्याची मागणी होते आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यासंदर्भात अधिकाऱ्यांना फोन केला होता. तसंच गौतमीला ट्रोलही केलं जातं आहे. ज्यानंतर गौतमीने आता माध्यमांसमोर येत तिची बाजू मांडली आहे. तसंच आपण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही असंही तिने सांगितलं आहे. यावेळी गौतमीला अश्रू अनावर झाले होते.

मी कारमध्ये नव्हते, कार माझ्या चालकाकडे होती

अपघात झाला तेव्हा मी त्या कारमध्ये नव्हते. माझी कार माझ्या कारचालकाकडे होती. शिवाय मला जेव्हा समजलं की अपघात झाला तेव्हा मी मदतीचा हात पुढे केला. माझे मानलेले भाऊ आहेत त्यांच्याकडून मी संबंधित रिक्षावाल्यांच्या कुटुंबीयांना मदतही पाठवली. मात्र त्यांच्याकडून मदत नाकारण्यात आली. त्यांनी सांगितलं की जे काही चाललं ते आपण कायदेशीर करु. म्हणून मग आता कायदेशीर मार्गाने जर सगळं होऊ देत असं गौतमी पाटीलने म्हटलं आहे. मी गरीब घरातूनच आलेली मुलगी आहे. माझ्याकडून मदत पाठवली होती. पण त्यांनी ती मदत नाकारली. पहाटे पाचच्या सुमारास अपघात झाला त्यानंतर दुपारी माझं बोलणं झालं होतं. मात्र त्यांनी मदत नाकारली, कायदेशीर सगळं करु असं सांगितलं त्यामुळे मी गप्प बसले. पण नंतर कुणी काहीही बोलतं आहे. ज्याला काहीच अर्थ नाही असंही गौतमीने सांगितलं.

मला नाहक बदनाम केलं जातं आहे-गौतमी पाटील

जिथे माझा काही संबंध नाही, तिथे माझं नाव बदनाम केलं जातं आहे. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य दिलं. कारची कागदपत्रं, चालकाचे तपशील, अपघात झाला तेव्हा मी कुठे होते? ही सगळी माहिती मी पोलिसांना दिली आहे. ही माहिती मी सार्वजनिक केली पाहिजे असं मला वाटत नाही. कायदेशीर मार्गाने ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मी आता करते आहे. मी कुटुंबियांचं सांत्वन करायला गेले नाही हे बरोबर आहे. कारण माझ्या तारखा आधी घेतलेल्या असतात. समोरुन मला अॅडव्हान्स येतो, खर्च खूप झालेला असतो. त्यामुळे मी माझी कामं रद्द करु शकत नाही. माझे भाऊ लोक तिथे होते, त्यांना छान छान रिप्लाय दिले गेले. आता जे काही घडलं आहे ते माध्यमांना माहीत आहे. अशी उत्तरं दिल्यानंतर मी कशी काय जाणार? त्यामुळे मी शांत बसले. पण आज चार पाच दिवस झाले की मला प्रचंड ट्रोलिंग केलं जातं आहे. मी सुरुवातीपासून मी ट्रोल झाले आहे. मी चांगलं केलं तरीही मला वाईट म्हणतात आणि वाईट केलं तर बदनामी करतातच. अपघात व्हायला नको होता हे मला मान्य आहे. मला चालकाने सांगितलं की मी कार नेतो आहे. तो बहुदा देवाच्या ठिकाणी गेला होता. अपघातानंतर माझं आणि कार चालकाचं बोलणं झालेलं नाही असंही गौतमीने सांगितलं. एबीपी माझाशी गौतमीने संवाद साधला त्यावेळी गौतमीने हे सगळं सांगितलं.

Gautami Patil News
गौतमी पाटीलला अटक करण्याची मागणी रिक्षा चालकाच्या मुलीने केली आहे. (फोटो-RNO and Gautami Patil-FB )

मी कारमध्ये नव्हते तरीही आरोप का केले जात आहेत?

मी त्या कारमध्ये नव्हते तरीही आरोप केले जात आहेत. पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळं चेक केलं आहे. तरीही हा आरोप का केला जातो आहे? तुम्ही एखाद्याला एवढं कसं काय बोलू शकतात? मला खूप त्रास झाला आहे त्यामुळे मी समोर येऊन बोलते आहे. मी कायम ट्रोलच होते आहे. मला खूप म्हणजे खूप त्रास दिला जातो आहे असं गौतमीने ढसाढसा रडत सांगितलं.

गौतमी पाटीलच्या वकिलाने काय सांगितलं?

गुन्हा घडला आहे तो गौतमी पाटील यांच्या चालकाकडून झाला आहे. गौतमी पाटील यांना ३० सप्टेंबरला नोटीस दिली होती. त्यावेळी त्यांच्याकडे जी माहिती होती ती सगळी माहिती त्यांना देण्यात आली आहे. पोलिसांना तपासात सहकार्य करत आहेत. मात्र गौतमी पाटील यांची बदनामी केली जाते आहे असं गौतमी पाटील यांच्या वकिलांनी सांगितलं. जे पीडित आहेत त्यांना कायदेशीर प्रक्रियेतून मदत केली जाईल.

रिक्षाचालकाच्या कुटुंबाला मी भेटायला जाणार नाही कारण…

अपघात झाला हे खूपच वाईट झालं, पण मी त्या कुटुंबीयांना भेटायला जाईन असं मला वाटत नाही. कारण माझ्याबाबतीत ज्या काही गोष्टी त्यांनी उठवल्या आहेत. मला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आलं, त्यामुळे मी दुखावले आहे. त्यामुळे मला नाही वाटत की मी त्या कुटुंबाला भेटायला जाईन. मी जर खरंच गुन्हेगार असते तर मला सगळं ट्रोलिंग, आरोप मला मान्य केले असते. मी काही चुकीचं केलं नाही. मी ज्या गोष्टी केल्या नाहीत त्याबद्दल आरोप होत आहेत त्याचा मला जास्त त्रास झाला.