International Water Prize to Dr. Himanshu Kulkarni: भारतातील शास्त्रज्ञ अथक परिश्रमातून संशोधनाचे कार्य करत असतात. आजवर अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी महत्त्वाचे शोध लावले आहेत. या यादीत आता पुण्यातील भूजलतज्ज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांचीही नोंद केली जाईल. अमेरिकेतील ओक्लाहोम विद्यापीठातील वॉटर सेंटरकडून प्रायोजित केलेला ‘आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार’ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांना मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते भारतीय उपखंडातील पहिलेच शास्त्रज्ञ ठरले आहेत. पाणी पुरवठा आणि स्वच्छता क्षेत्राशी संबंधित जगभरात होणाऱ्या चांगल्या कामाचा गौरव करण्यासाठी सदर पुरस्कार दोन वर्षांतून एकदा दिला जातो. २००९ पासून या पुरस्काराची सुरुवात झाली होती.

डॉ. कुलकर्णी यांना हा पुरस्कार मिळणार असल्याची घोषणा २०२४ साली झाली होती. नुकतेच १५ सप्टेंबर रोजी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ट्रॉफी आणि रोख २५ हजार डॉलर्स (भारतीय रुपयांमध्ये २२ लाख) असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

डॉ. हिमांशू कुलकर्णी गेल्या अनेक वर्षांपासून भूजल व्यवस्थापन आणि त्याच्याशी निगडित सामाजिक प्रयत्नांवर काम करत होते. नीति आयोगाच्या १२ व्या योजनेच्या कार्यगटाचे ते सह-अध्यक्षही होते. तसेच राष्ट्रीय जलचर मॅपिंग कार्यक्रमाच्या मसुद्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. पुण्यातील ‘अ‍ॅक्वाडाम’ (Advanced Center for Water Resources Development and Management) संस्थेचे संस्थापक विश्वस्त आणि सचिव म्हणून ते काम करत आहेत. याचबरोबर शिव नाडर इन्स्टिट्यूट ऑफ एमिनेन्स डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीमध्ये ते ग्रामीण व्यवस्थापन विषयाचे प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत.

द इंडियन एक्सप्रेसशी बोलत असताना डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी सदर पुरस्कारबद्दल सांगितले की, अ‍ॅक्वाडाम आणि त्याच्याशी निगडित संस्थांनी भूजल व्यवस्थापनासाठी केलेल्या एकत्रित कामाचा परिपाक म्हणून हा पुरस्कार आहे, असे मी समजतो. भारतातील भूजल संसाधनांशी निगडित संकटाचे निराकारण करायचे असेल तर भूजल व्यवस्थापनावर काम करणे हा एकमात्र पर्याय आहे.

आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार कुणाला दिला जातो?

विकसनशील देशांमधील गरीबीत जीवन जगाणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करून पाणीपुरवठा आणि स्वच्छता क्षेत्रात संशोधन, अध्यापन आणि सेवा अशा उपक्रमांद्वारे महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सदर पुरस्कार दिला जातो.