कराड : आजी- माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध प्रशासकीय समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुणे विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आजी- माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटुंबीयांसोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, माजी सैनिक प्रशांत कदम यांच्या पाठपुराव्यामुळे ही कार्यवाही शक्य झाली आहे. कदम यांनी दोन मे रोजी विभागीय आयुक्तांची भेट घेऊन आजी- माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय व त्यांचे वारस यांना विविध शासकीय विभागांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणींबाबत निवेदन सादर केले होते.

महसूल, पोलीस, नगरविकास, भूमी अभिलेख, ग्रामविकास आदी विभागांमध्ये अनेक समस्या प्रलंबित असून, त्याबाबत समन्वयाने उपाययोजना व्हाव्यात, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त बैठक घेण्याची मागणी कदम यांनी केली होती. विभागीय आयुक्तांनी त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अशा बैठका आयोजित करण्याचे पत्र जारी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या निर्णयामुळे माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि शहीद जवानांच्या वारसांना प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे. या पुढाकाराबद्दल सैनिक वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.