संबंधित युवतीनेच दिली माहिती ; तिघांवर गुन्हा दाखल

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाई: पुणे जिल्ह्यातील एका आमदाराला युवतीच्या साह्याने हनी ट्रॅपमध्ये अडकवून पैसे उकळण्याचा कट तिघा युवकांनी रचला होता. परंतु, संबंधित युवतीनेच आमदारांच्या पुतण्याला याची माहिती दिल्याने कट उघडकीस आला. याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यात पुतण्याने दिलेल्या तक्रारीवरून शैलेश शिवाजीराव मोहिते-पाटील रा. सांगवी जि. पुणे, राहुल किसन कांडगे रा. चाकण जि. पुणे व सोमनाथ दिलीप शेडगे रा. सातारा यांच्यावर सातारा तालुका ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत माहिती अशी, शेलपिंपळगांव ता. खेड जि. पुणे येथील मयुर साहेबराव मोहिते पाटील यांचे सख्खे चुलते दिलीप दत्तात्रय मोहिते-पाटील हे विद्यमान आमदार आहेत. मयूर मोहिते-पाटील यांना दि. 22 रोजी पूजा नामक युवतीने फोन केला व सांगितले की बारा दिवसांपूर्वी शैलेश मोहिते-पाटील रा.सांगवी जि.पुणे व राहुल कांडगे रा.चाकण यांनी संबंधित युवतीला पैसे व फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून आ. दिलीप मोहिते-पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये ओढून पैसे उकळण्यास सांगितले होते. परंतु, हे मान्य नसल्याचे सांगत युवतीने मयूर यांना सर्व हकीकत सांगितली.
त्यानंतर दि. 23 रोजी मयूर व चुलते राजेंद्र मोहिते-पाटील हे सातारा येथे संबंधित युवतीला भेटलेे व याबाबत विचारपूस केली. यावेळी संबधित युवतीने सांगितले की, ‘दि. 12 रोजी सकाळी 11.30च्या सुमारास युवतीच्या फ्लॅटवर तिचा मित्र सोमनाथ दिलीप शेडगे हा दोन व्यक्तीना घेवून आला व त्यांची नावे शैलेश शिवाजीराव मोहिते-पाटील रा. सांगवी, जि. पुणे व राहूल किसन कांडगे, रा. चाकण, जि. पुणे अशी सांगितली. यानंतर शैलेश मोहिते-पाटील व राहुल कांडगे यांनी युवतीला सांगितले की, आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्याकडे नोकरी मागण्याकरीता जावून जवळीक साधून, त्यांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन बदनामीची भिती घाल. त्यांचेकडून आपण जास्त पैसे उकळायचे आहेत. त्यासाठी सर्व मदत करू असे सांगून तसा प्लॅन त्यांनी केला. त्या बदल्यात युवतीला पैसे व पुण्यात नवीन फ्लॅट घेवून देवू असे सांगितले व लागलीच 20 हजार दिले. त्यापैकी सोमनाथ शेडगे याने 5 हजार घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा शैलेश मोहिते-पाटील यांनी सोमनाथ शेडगे याच्याकडे 40 हजार दिले. त्यापैकी युवतीला सोमनाथने 22 हजार दिले. त्यानंतर शैलेश मोहिते-पाटील यांनी युवतीच्या बँक अकौंटवर 30 हजार पाठवले. त्यापैकी 24 हजार 400 रुपये गुगल पे ने सोमनाथ शेडगे याला युवतीने पाठविले आहेत. त्यानंतर संबंधित युवतीला आमदारांची बदनामी करण्याचा प्रकार चुकीचा आहे, असे वाटले म्हणून तीने फोन करुन व सर्व प्रकार सांगितला.
त्यानंतर मयूर मोहिते-पाटील यांनी सातारा तालुका ठाण्यात फिर्याद दिली असून तिघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune mla was tricked into falling into a honey trap akp
First published on: 24-04-2021 at 23:02 IST