पुण्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर, असंख्य नागरिकांच्या गाड्या देखील वाहून गेल्या आहेत. या सर्व घटना घडत असताना,  नांदेड सिटीमध्ये राहणार्‍या अमृता आनंद सुदामे या धायरी येथील पुलावरून दुचाकीवरून जाताना, पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकीसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर अमृता सुदामे यांच्या बहीण निशा वायकर यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, “अमृता ही नेहमीप्रमाणे दुपारी एक वाजता कामास गेली होती, कामावरून 10 वाजता घराकडे निघाली. ती साधारण साडेदहा वाजता घरी येणे अपेक्षित होते. मात्र, बराच वेळ झाल्यावरही न आल्याने आम्ही आसपासच्या भागात शोध घेतला. नंतर, पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केल्यावर तब्बल 8 तासांनंतर ‘सनसिटी’च्या बाजूला असलेल्या क्रिकेटच्या मैदानावर पोलिसांना मृतदेह आढळून आला”. हे सांगताना  निशा यांना अश्रू अनावर झाले. अमृता यांच्या पश्चात आता दोन मुली असून पती मुंबई येथे कामानिमित्त गेले असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी वाचा- आम्ही लवकर बाहेर पडायला पाहिजे होतं; जगन्नाथ यांच्यावर दुःखाचा डोंगर

दरम्यान, पुण्यात बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने हाहा:कार उडाला असून अनेक रस्ते व वस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. आतापर्यंत रौद्र रूप धारण करत पावसाने एकूण ११ जणांचे बळी घेतल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त डी. वेंकटेशम यांनी दिली.