नांदेड : महाराष्ट्र करमणूक कर अधिनियमांतील तरतुदींचे उल्लंघन करून चित्रपटगृहात जादा दर आकारून कर चुकवेगिरी करणाऱ्या येथील पीव्हीआर व्यवस्थापनास बुडविलेल्या करावर २ कोटींचा दंड ठोठावला. याप्रकरणी कर आणि दंडापोटी २ कोटी २१ लाख रुपये शासनाकडे जमा करण्याचा आदेश नांदेडचे अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी गुरुवारी पारित केला.

नांदेड शहराच्या दक्षिणेकडील ‘ट्रेझर मॉल’मध्ये पीव्हीआर चित्रपटगृह असून, वैद्यकीय व्यवसायात नावाजलेले डॉ. मनीष कत्रुवार यांच्या मालकीच्या कंपनीतर्फे वरील मॉल चालवला जातो. याच मॉलमध्ये पीव्हीआरच्या व्यवस्थापनाखालील चार वेगवेगळ्या पडद्यांचे बहुविध चित्रपटगृह आहे. या चित्रपटगृहाने मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनात प्रेक्षकांकडून निर्धारित दरापेक्षा अधिक दराने शुल्क आकारल्याची बाब २०१६ साली समोर आली तेव्हा चौकशी झाली. संबंधितांवर ३ लाख ५३ हजार रुपये निश्चित करून १० टक्के दंडासह ३९ लाखांचा करमणूक कर भरण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर अपर विभागीय आयुक्तांनी दंड कायम ठेवल्यामुळे वरील व्यवस्थापनाने महसूल मंत्र्यांकडे दाद मागितली होती. या प्रकरणात महसूल मंत्र्यांच्या ५ मार्च २०२० च्या आदेशानुसार नांदेडच्या अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोर वेळोवेळी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान पीव्हीआरतर्फे ॲड. नितीन सोनकांबळे यांनी बाजू मांडली.

अपर जिल्हाधिकाऱ्यांसमोरील सुनावणीतून अनेक बाबींचा उलगडा झाला. संबंधितांनी हिंदी व मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनातून ग्राहकांकडून कमी किंवा अधिक रक्कम वसूल केल्याचे निदर्शनास आले. सर्व बाबींचे विश्लेषण करण्यात आले असता मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनातून ४ लाख ५९ हजार तर हिंदी चित्रपटांच्या प्रदर्शनातून १५ लाख ५४ हजारांच्या करमणूक कराचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. संपूर्ण अभिलेख आणि एकंदर प्रकरणाच्या गुणात्मक बाबींचा विचार करता अर्जदार पीव्हीआर व्यवस्थापनाने १७ जुलै २०१५ ते ३१ मे २०१६ या कालावधीमध्ये चित्रपट प्रदर्शनातून महाराष्ट्र करमणूक कर अधिनियमांतील कलम (३) उल्लंघन केल्याचे नमूद करून शासनाचे २० लाख १३ हजार ७८३ रुपयांचे नुकसान झाल्याचे निश्चित करण्यात आले. त्यावर १० पट दंड म्हणून २ कोटी १ लाख ३७ हजार रुपये अर्जदारावर निश्चित करण्यात आले आहेत. संबंधितांनी २ कोटी २१ लाख ५१ हजार ६१६ रुपये शासनाकडे ३० दिवसांच्या आत जमा करावेत, असा आदेश देण्यात आला. या आदेशाची प्रत नांदेड तहसीलदारांना जारी करण्यात आली असून त्यांनी व्यवस्थापक व संचालक, पीव्हीआर आयनॉक्स लि., संचालक, नांदेड ट्रेझर बा. प्रा.लि. आणि डॉ. मनीष कत्रुवार यांच्या नावे असलेल्या मालमत्ता पत्रकांवर संबंधित आदेशाची नोंद करावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.