अहिल्यानगर : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग व भाजप सरकार यांच्यावर केलेल्या मतदार चोरीच्या आरोपावरून वरिष्ठ पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असतानाच त्याचे पडसाद जिल्ह्यातील नेत्यांमध्ये उमटले आहेत. भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामध्येही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
संसदेच्या फेब्रुवारीमध्ये झालेल्या अधिवेशनात राहुल गांधी यांनी शिर्डी मतदारसंघातील एकाच इमारतीत सात हजार मतदार नोंदवले गेल्याचा आक्षेप घेतला होता. त्याचाही संदर्भ विखे-थोरात यांच्या सध्याच्या परस्परविरोधी फैरीमध्ये दिला जात आहे. या संदर्भात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे आयोगाने देणे आवश्यक आहे. मात्र आयोगाच्या आक्षेपांमुळे भाजपच अस्वस्थ झाला आहे. कारण त्यांची खरी चोरी ओळखली गेली आहे. शिर्डी मतदारसंघात मतदार नोंदणी घोटाळा चाललेला आहे, याच्या तक्रारी केल्या होत्या. हजारो मतदार वाढवले जात आहेत, याच्याही तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही.
त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, ज्या वेळेस आंध्र प्रदेशमध्ये तुमचे सरकार येते तेव्हा बोगस मतदान झाले, असा आरोप तुम्ही कधी केला का?, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार आले, बोगस मतदानामुळे आले का? लोकसभेत मोठा जनादेश ‘निगेटिव्ह नॅरेटीव्ह’ वर जनादेश मिळाला, तो विधानसभेत मिळाला नाही. कारण लोकांनी त्यांचा खरा चेहरा ओळखला. म्हणूनच महाविकास आघाडी धुडकावून लावली गेली. अनेक प्रस्थापित पराभूत झाले. त्याचे खापर तुम्ही बोगस मतदार नोंदणीवर फोडत असाल तर मतदारांचा तुम्ही अपमान करत आहात.
भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे व काँग्रेसचे माजीमंत्री बाळासाहेब थोरात या दोन पारंपारिक विरोधक नेत्यांमध्ये आरोपांची जुगलबंदी वेळोवेळी रंगत असते. हे दोन्ही नेते पूर्वी जेव्हा एकाच म्हणजे काँग्रेस पक्षात होते तेव्हाही त्यांच्यामध्ये ही जुगलबंदी चालत असे. आता विखे भाजपमध्ये तर थोरात कॉंग्रेस अशा दोन स्वतंत्र पक्षात असल्यामुळे त्याला अधिक धार चढू लागली आहे.