पक्षाची ध्येयधोरणे न पटल्याने शिवसेनेतून अनेक मातब्बर नेते पक्ष सोडून जात आहेत, त्याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही तेच केल्याने त्यांना गद्दार म्हणून हिणवून त्यांच्या सभा उधळणे अयोग्य आहे. आम्ही काँग्रेसवाले संयमी व धोरणी आहोत, मात्र आम्हीही बांगडय़ा भरलेल्या नाहीत. वाकचौरेंच्या सभेत गोंधळ, गडबड करणा-यांना यापुढे जशास तसे उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे असा इशारा कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज येथे दिला.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ विघ्नेश्वर मंदिरात झाल्यानंतर कार्यकर्त्यांंच्या मेळाव्यात विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यावेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, याआधी झालेले प्रत्येक हेवेदावे कार्यकर्त्यांंनी विसरून जावे. गाव पातळीवरील ग्रामपंचायत, सोसायटय़ांचे राजकारण देश व राज्य पातळीवर आणू नका. कुणाच्याही आदेशाची वाट न पाहता आघाडीचे उमेदवार वाकचौरे यांना विजयी करण्यातचा संकल्प करा असे आवाहन त्यांनी केले. देशात पुन्हा आघाडीचीच सत्ता येणार आहे असा दावाही त्यांनी केला. महसूलमंत्री थोरात यांचेही यावेळी भाषण झाले.