राहाता:समाजात वितुष्ट निर्माण होईल अशी वक्तव्य करण्याचा काहींनी ठेका घेतला आहे. पुरोगामी महाराष्ट्राला अशी वक्तव्य मान्य होणार नाहीत. सामाजिक एकतेला यातून तडा जातोय याचे भान नेत्यांनी ठेवले पाहिजे, अशी टीका जलसंपदा तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यावर सोमवारी लोणी येथे माध्यमांशी बोलताना केली.
मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी दसऱ्यानंतर पुन्हा आंदोलनाच्या दिलेल्या इशाऱ्याकडे लक्ष वेधले असता विखे यांनी तसे काही होणार नाही. गावपातळीवर नेमलेल्या समित्यांना थोडा वेळ लागत आहे. यंत्रणेला काम करू द्यायला हवे. त्यांच्या मागणीप्रमाणे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी सरकारने प्रमाणपत्र वितरीत केले हे लक्षात घेतले पाहिजे, असे सांगितले.
आरक्षणाच्या प्रश्नावरून कोणावर हल्ले करणे, गाड्या जाळणे याचे समर्थन होऊ शकत नाही. कायदा हातात घेऊन प्रश्न सुटणार नाहीत. हल्लेखोरांवर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका विखे यांनी मांडली.
वस्तू सेवाकर कमी करण्याबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेले वक्तव्य व्यक्तिद्वेषापोटी असून, देशातील जनतेचा अवमान करणारे आहे. त्यांनी देशवासीयांची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी विखे यांनी केली. जीएसटी कौन्सिलमध्ये काँग्रेसशासित राज्याचे मुख्यमंत्री सुध्दा आहेत. त्यामुळे खर्गे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. काँग्रेस अध्यक्षांनी इतका व्यक्तिद्वेष ठेवणे योग्य नाही. मल्लिकार्जुन खर्गे यांचे वक्तव्य देशवासीयांचा अवमान करणारे असल्याने त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी विखे यांनी केली.
दोन्ही ठाकरेंमुळे आघाडीत बिघाडी
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याने महाविकास आघाडीची बिघाडीकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे सांगून, आघाडीत कधीतरी बिघाडी होणार हे आपण पहिल्या दिवसांपासून सांगत होतो. त्याची लवकरच सुरुवात होईल, असे सूतोवाच मंत्री विखे यांनी केले.
मराठा आरक्षणाच्या विषयावर मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावरील टीका तीव्र केली आहे. विखे यापूर्वीही हाके यांच्या भूमिकेवर टीका करत असले तरी त्याची भाषा सौम्य होती परंतु उपसमितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शेतीचा धारदार बंल्याची चर्चा होत आहे.