राहाता: शिबलापूर–गुहा फाटा हा फक्त २० किमीचा रस्ता असला, तरी त्यावरून प्रवास करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण, अशी अवस्था झाली आहे. या मार्गावरून संगमनेर–नगर असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव अक्षरशः मुठीत घेऊन प्रवास सुरू आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नगर-मनमाड रस्त्यावरील राहुरी तालुक्यातील गुहा फाटा येथून शिर्डी- शिबलापूर मार्ग हा रस्ता संगमनेरला जाणारा जवळचा महत्त्वाचा जिल्हा मार्ग आहे. या रस्त्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. पावसामुळे खड्डे पाण्याने भरले आहेत. डांबर उखडल्याने काही खड्ड्यांची खोली वाढल्याने कार,जीप, ट्रॅक्टरदेखील खड्ड्यात अडकतात. दुचाकी वाहन तर घसरून थेट अपघाताला आमंत्रण देतात. रस्त्यावरून जाणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले, की दररोज शाळेत जायचे की मृत्यूला भेटायला निघायचे, हेच समजत नाही. एवढेच नव्हे, तर आपत्कालीन सेवादेखील विस्कळीत झाल्या आहेत. रुग्णवाहिका घटनास्थळी वेळेत पोहोचत नाहीत. एखाद्या गंभीर अपघाताच्या ठिकाणी पोहोचताना वेळ गेल्याने जीव धोक्यात जातो.
याशिवाय दुतर्फा वाढलेल्या बाभळीच्या काटेरी फांद्या, झुडपे आणि इतर झाडांनी रस्ता गिळून टाकला आहे. साइड पट्ट्यांवर झाडे आल्याने वाहनचालकांना बाजूला जाणे अशक्य होत आहे. अनेकदा ट्रॅक्टर, जीप किंवा अवजड वाहने आल्यावर समोरच्या वाहनाला धोकादायकरीत्या मागे घ्यावे लागते.
आंदोलन करावे लागेल
शिबलापूर–गुहा हा रस्ता देवगाव जाखुरी, पिंपरणे, कनोली,ओझर, शेडगाव, हंगेवाडी, मालुजे,पानोडी, आश्वी दाढ, खुर्द, पिंप्री खळी, झरेकाठी, चनेगाव, निंभेरे, तांभेरे, सोनगाव, आनपवाडी अशा तब्बल ४० गावांचा मुख्य रस्ता आहे. हजारो शालेय विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि व्यावसायिक दररोज या मार्गावरून प्रवास करतात; मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम झाला आहे. संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही फक्त आश्वासने मिळत आहेत. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त असून, तातडीने रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा भडका उडेल. -संजय गायकवाड, माजी उपसरपंच, आश्वी खुर्द
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन देणार
गुहा फाटा – शिबलापूर या रस्त्यावरील सुमारे ४० गावांचा हा रस्ता जिव्हाळ्याचा विषय असून, हा प्रश्न पालकमंत्री राधाकृष्ण विखे तसेच युवा नेते सुजय विखे यांची भेट घेऊन निवेदन देणार आहे, ते निश्चित मार्ग काढतील. – सोमनाथ डोळे, बूथप्रमुख भाजप, झरेकाठी