राहाता : विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानरुपी प्रार्थनेचा हजारो विद्यार्थ्यांनी आज, गुरुवारी सामुदायिक गजर केला. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संत ज्ञानेश्वरांच्या ७५० व्या जयंती दिनानिमित्ताने सांघिकपणे विद्यार्थ्यांनी पसायदान म्हटले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंती दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारने सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पसायदानरुपी प्रार्थना आयोजित करण्याचा निर्णय घेतला. जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पुढाकाराने आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे यांच्यासह प्रवरा शैक्षणिक संकुलातील सर्व शाळा, महाविद्यालयात पसायदानरुपी प्रार्थना करण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेची ओळख, अध्यात्मिक मूल्यांची जाणीव आणि सामाजिक एकतेचा संदेश पोहचावा हा उद्देश या पाठीमागे असल्याचे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे यांनी सांगितले.
प्रवरा शैक्षणिक संकुलातील प्रवरा कन्या विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय, प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल लोणी आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये एकत्रितपणे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास संस्थेेचे शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे, प्राचार्या रेखा रत्नपारखी, विद्या घोरपडे आदींसह शिक्षक सहभागी झाले होते. याशिवाय प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर, प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूल, लोणी येथील विखे पाटील सैनिकी स्कूल या इंग्रजी शाळासह सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये पसायदान म्हटले गेले.
प्रवरा शिक्षण संकुलाच्या माध्यमातून सर्वसमावेशक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. नोकरी उपलब्ध करण्याबरोबरच देशासाठी आदर्श, सुसंस्कृत नागरिक घडवण्याचे काम प्रवरेच्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्यासाठी अनेक उपक्रम हे सुरू असतात. शिक्षणाबरोबरच नोकरी आणि रोजगार उपलब्ध करून देण्यातही प्रवरा ही कायमच आघाडीवर राहिली आहे. आज अनेक विद्यार्थी जागतिक पातळीवरती विविध क्षेत्रांत आणि शासकीय सेवेत कार्यरत आहे. त्यांनी जगभरात प्रवरेचा नावलौकिक वाढविला आहे. प्रवरेच्या शिक्षण संकुलाची प्रगती बघता राज्यभरातून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित कॅम्पस म्हणून प्रवरेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
संस्थेच्या माध्यमातून संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमामध्ये प्रवरा शैक्षणिक संकुल प्रयत्नशील असते. यामुळे संस्कारक्षम शिक्षण देण्याबरोबरच संतांचे चरित्र आणि शिवरायांचे गड किल्ले त्याचबरोबर देशाची कला संस्कृती परंपरा याविषयीचेही ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हर घर तिरंगा हे अभियानही संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आले आहे. -डॉ. सुस्मिता विखे, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, लोणी