अहिल्यानगर: आई-वडील विभक्त झाल्याने दूरच्या नातेवाईकांकडे सांभाळ करण्यासाठी दिलेल्या एकाच कुटुंबातील सख्ख्या ४ बहिणींवर पालनकर्त्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा राहुरी पोलिसांनी दाखल केला आहे. या संदर्भात पती-पत्नीला अटक करण्यात आली असून, त्यांना उद्या, शुक्रवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याची माहिती राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.

स्नेहालय संचालित उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. या कार्यकर्त्यांनी राहुरी पोलिसांचे लक्ष वेधल्यानंतर पोलीस निरीक्षक ठेंगे यांनी तातडीने हालचाल करत चौघींची मुक्तता केली व दोघांना अटक केली.

राहुरी तालुक्यात घडलेल्या या खळबळजनक घटनेतील चौघी पीडित मुली एकाच कुटुंबातील व नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यातील एक मुलगी सज्ञान तर इतर ३ मुली अल्पवयीन आहेत. सज्ञान झालेल्या मुलीचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला. त्यापूर्वी व ती बहिणींना भेटण्यासाठी राहुरी तालुक्यात आल्यानंतर पुन्हा तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अल्पवयीन मुलींपैकी एक १६, दुसरी १४ व तिसरी १० वर्षांची आहे. सज्ञान व विवाहित मुलीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पीडित चारही मुली नाशिक जिल्ह्यातील आहेत. त्यांचे आई-वडील विभक्त झाल्याने त्यांना राहुरी तालुक्यातील दूरच्या नातेवाईकांकडे सांभाळ करण्यासाठी चार ते पाच वर्षांपूर्वी ठेवण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर अत्याचार सुरू होते. यातील एक मुलगी सज्ञान झाली. तिचा विवाह चार महिन्यांपूर्वी झाला. त्यानंतर ती सासरहून आपल्या बहिणींना भेटण्यासाठी चार दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यात आली. त्यावेळी तिने झालेल्या अत्याचाराची माहिती पतीला दिली. दोघांनी स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक राजू जाधव, अंमलदार राहुल यादव, शकूर सय्यद, गणेश लिपणे, अंकुश भोसले, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, सतीश कुऱ्हाडे, मीना नाचन, वंदना पवार तसेच कार्यकारी दंडाधिकारी सोपान बाचकर व पंचासमक्ष मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुलींची सुटका केली. पीडित मुलींचे समुपदेशन करून त्यांना स्नेहालय संस्थेमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या लैंगिक अत्याचार प्रकरणी राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पती-पत्नीला अटक करण्यात आली असून, त्यांना उद्या, शुक्रवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार असल्याची माहिती राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिली.