नगर : जिल्ह्याच्या काही भागास काल, मंगळवारी रात्री वादळी पावसासह गारपिटीचा फटका बसला. त्यामुळे गव्हासह मका, कांदा, हरभरा पिकाचे नुकसान झाले. गेल्या वर्षीच्या खरिपात अतिवृष्टी व सततच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. आता रब्बी हंगामातही अवकाळीचा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून विशेषत: रात्री आकाश ढगाळ राहत होते. हवामान विभागानेही पावसाचा अंदाज वर्तवला होता. काल सायंकाळनंतर सोसाटय़ाच्या वाऱ्यासह आभाळ भरून आले. विजांचा गडगडाटही होत होता. रात्री आठनंतर पाऊस सुरू झाला. राहुरी, नेवासा, नगर व कर्जत तालुक्याच्या काही भागात जोरदार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणच्या शेतातील पिके झोपली. काढणीला आलेल्या ज्वारीसह गहू चिकात, पोटरीत होता. गहू झोपला गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यावर माव्याचा प्रादुर्भाव जाणवण्याची शक्यता आहे. रांगडा कांदा काढणीला आला होता. त्याचेही मोठे नुकसान झाले.काही ठिकाणी कांद्याची लागवड सुरू होती, त्यावरही करपा पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी बुरशीनाशकाचा वापर करावा असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. मक्याची कणसेही लोळली गेली. राहुरी तालुक्यातील वांबोरी, कातड्र, गुंजाळे व नेवासे तालुक्यातील चांदा परिसरात गारपीट झाल्याचे वृत्त आहे. गारपिटीने गव्हाचे मोठे नुकसान झाले. नगर तालुक्याच्या नागापूर, जेऊर, भिंगार, नालेगाव भागातही कमी अधिक स्वरूपाचा पाऊस झाला. नेवासा व राहुरी तालुक्यात नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी नलगे यांनी दिली.

बुधवार सकाळपासून अनेक भागात ढगाळ वातावरण होते. हवेतील गारठाही वाढलेला होता. त्यामुळे शेतीपिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज सकाळी आठ वाजता गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे (आकडे मिमी.मध्ये)- चांदा २४.८, घोडेगाव १७.८, वडाळा ५.५, सोनई २, सलाबतपुर १.८, नेवासे खुर्द १.८, वांबोरी १३.५, ब्राह्मणी १.५, मिरी (पाथर्डी) १.३, कर्जत ६ व माहीजळगाव ६ मिमी.