Konkan Raigad Rain :अलिबाग: रायगड जिल्ह्यात मागील सहा दिवस पावसाने झोडपून काढले असले तरी सर्व सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा कमी पावसाची नोंद झाली आहे. कोकणातील पाच जिल्ह्यांच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.  इतर  जिल्ह्यांंच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात एकूण पर्जन्यमानाची  सरासरी कमी आहे.  रायगड जिल्ह्यात एकूण  वार्षिक पर्जन्यमानाच्या केवळ ७९ टक्के पाऊस झाला आहे.

साधारण जून महिन्यात मान्सूनची सुरुवात होते. यंदा मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात पावसाला सुरूवात  झाली.मे महिन्यात पडलेला पाऊस   मान्सूनपूर्व पाऊस होता.  जून महिन्यापासून मान्सूनला सुरुवात होते. रायगड जिल्ह्यात  जून महिन्यात  सरासरीपक्षा जास्त 107  टक्के  पाऊस पडला.  जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. ऑगस्ट महिन्यात सुरूवातीला कमी पाऊस होता.  मागील साह दिवस चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याची सरासरी भरून काढली गेली.

ऑगस्ट महिन्यात सरासरी  ५३६ मिमी पाऊस पडतो.  १९ ऑगस्टपर्यन्त  ४३४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या ८१ टक्के पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्याचे अजून १० दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे ऑगस्ट पाऊस  महिन्याची सरासरी गाठेल अशी शक्यता आहे.  रायगडात जूनपासून ऑगस्ट महिन्यापर्यन्त २ हजार ३९८ मिमी पाऊस पडतो. १९ ऑगस्टपर्यन्त १ हजार ८९६ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच जून महिन्या पासून ऑगस्ट महिन्यापर्यन्तच्या पावसाच्या सरासरीच्या ७९ टक्के पाऊस झाला आहे . जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यात  सरासारी ३ हजार १४८  मिमी पाऊस पडतो. आतापर्यन्त एकूण पर्जन्यमानाच्या ६० टक्के पाऊस पडला आहे.

ऑगस्ट महिन्यातपर्यंन्त  कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यांपेक्षा रायगड जिल्ह्यात अतापर्यन्त कमी पाऊस पडला आहे. कोकणात सरासरीच्या ८९ टक्के पाऊस पडला आहे. रायगड  जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात सर्वाधिक ८२ टक्के पाऊस पडला आहे. कर्जत तालुक्यात सर्वात कमी ४८ टक्के पाऊस झाला आहे. 

कोकणची सरासरी ः पालघर ८६ टक्के ,  ठाणे ८८  , रायगड ७९,  रत्नागिरी ९३, सिंधुदुर्ग ९१ , सरासरी ः ८९