जिल्हा नियोजन मंडळाच्या ३२ जागांसाठी १४  फेब्रुवारीला होणारी निवडणूक बिनविरोध झाली आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अंतिम दिवशी २० जणांनी अर्ज मागे घेतल्याने ३२ जागांसाठी ३२ जणांचे अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे या ३२ जणांची बिनविरोध झाली आहे.     जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणुकीसाठी १४ फेब्रुवारीला निवडणूक होणार होती. या निवडणुकीत ग्रामीण मतदारसंघातून २४, तर नागरी मतदारसंघातून ८ जणांची निवड केली जाणार होती. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ३२ जागांसाठी ५२ जणांनी आपले अर्ज दाखल केले होते. मात्र नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी २० जणांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.     यात राष्ट्रवादीच्या सर्वाधिक १०, शेकापच्या ७, शिवसेनेच्या ७, काँग्रेस ५, आरपीआय १, अपक्ष १ आणि माथेरान विकास आघाडी १ उमेदवाराचा समावेश आहे. यात ग्रामीण मतदारसंघातील २४ जागांसाठी शेकापकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कविता गायकवाड यांच्या सह माजी अध्यक्षा नीलिमा पाटील, जिल्हा परिषदेतील शेकाप गटनेते सुभाष पाटील, अरविंद म्हात्रे यांच्यासह सात जणांची निवड झाली आहे. शिवसेनेकडून माजी उपाध्यक्ष मनोहर भोईर, चंद्रकांत कळंबे, उत्तम कोळंबे आणि अक्षता कोळंबेकर यांच्यासह सहा जणांची निवड झाली आहे. तर राष्ट्रवादीकडून महेंद्र दळवी, शाम भोकरे, सुरेश टोकरे, पूजा थोरवे, माधुरी रोडे, वैषाली सावंत यांच्यासह सात जणांची निवड झाली आहे. कॉंग्रेस राजेंद्र पाटील, कौसल्या पाटील, इब्राहीम झमाणे या तिघांची वर्णी लागली आहे.
 नागरी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या कोटय़ातून रोह्य़ाचे नगराध्यक्ष अवधुत तटकरे, मंगेश दळवी, दीप्ती धोत्रे, माथेरान विकास आघाडीच्या सुनीता पमारे यांची वर्णी लागली आहे, तर काँग्रेसच्या कोटय़ातून सुनील कविस्कर, ज्योती म्हात्रे, सेनेच्या भावना कोळी, तर आरपीआयच्या किशोर पानसरे यांची निवड निश्चित झाली आहे.