अलिबाग : रायगड जिल्ह्याला रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुरुड, म्हसळा आण श्रीवर्धन तालुक्यात ३०० मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कर्जत तालुक्यातील बिरदोली गावात वीज पडून २५ वर्षीय तुरुणाचा मृत्यू झाला. सोमवारीही दिवसभर पावसाची संततधार कायम होती. त्यामुळे नदी किनाऱ्यांवरील गावांना तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान एनडीआरएफचे एक पथक महाड येथे तैनात करण्यात आले आहे.
मान्सून तळकोकणात दाखल झाला असतानाच रविवारी रात्रीपासून पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून कडले. अलिबाग उरण परिसरात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची संततधार सुरू होती. महाड, पोलादपूर , माणगाव, रोहा परिसरात रविवारी संध्याकाळपासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसाने जलमय झाले. मुरुड येथे ३७१ मिमी, श्रीवर्धन येथे ३०८ मिमी, तर म्हसळा येथे ३०० मिमी, माथेरान येथे १८१ मिमी, रोहा १६६मिमी, सुधागड १०४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
किल्ले रायगडावर जाणाऱ्या मार्गावर कोंझर येथे मोठं भगदाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोरी गेली वाहून गेली असून रस्ता खचला आहे. जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याच्या घटना घडत आहेत. म्हसळा गोरेगाव मार्गावर खामगाव इथे भले मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. प्रवाशांनी माणगाव घोणसे घाट मार्गे प्रवास करावा असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.
पेण खोपोली मार्गावर पहाटेच्या सुमारास साजगाव इथे रस्त्यात भले मोठे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. खोपोली नगरपालिका अग्निशमन विभाग आणि हेल्प फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी मेहनत घेऊन झाड कापून बाजूला केले. मुरुड शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मुरुड शहराच्या अनेक भागांत पावसाचे प्रवाह शिरले होते.
अलिबाग तालुक्यातील बेलोशी – महाजने रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे या गावाचा संपर्क तुटला होता. श्रीवर्धन नगरपालिका हद्दीत डोंगर उतारावर असलेल्या घरांमध्ये मातीचे ढिगारे खाली कोसळण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे तेथील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
कर्जत तालुक्यातील नेरळ – कळंब मार्गांवरील पुलावरून पाण्यामुळे वाहतूक बंद झाली. तर बिरदोली येथे रोशन कचरू कालेकर याचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. म्हसळा – श्रीवर्धन मार्ग पाण्याखाली बुडाल्याने वाहतूक ठप्प झाली. पेण तालुक्यातील सापोली – हेटवणे मार्गे गोंदाव फाट्याकडे येणाऱ्या मार्गांवरील मोरी खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सोमवारी सकाळी ८.०० वाजेपर्यंत पडलेला पाऊस
अलिबाग ७८.०० मिमी. मुरुड : ३७१, पेण ५०.००, पनवेल ८२.०४, उरण ५५.००, कर्जत ५४.०६, खालापूर ६२.००, माथेरान १८१.००, सुधागड १०४.००, माणगाव ६३.००, तळा १८२.००, महाड ९९.००, पोलादपूर ९४.००, श्रीवर्धन ३०७.००, म्हसळा ३००.००, रोहा १६६.००, एकूण : २२४९.०० मिमी, सरासरी : १४०.५६ मिमी