अलिबाग : पेण तालुक्यातील हेटवणे धरण क्षेत्रालगत असलेल्या गावात काल रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. भूकंप मापकावर या धक्क्यांची नोंद झाली नाही. मात्र खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या तज्ञांना या परीसरातील गावांचे सर्वेक्षण करण्याची विनंती केली आहे.

पेण तालुक्यातील तिलोरे, सुधागड तालुक्यातील महागाव परिसरात काल रात्री दहाच्या सुमारास पहिला भूकंपाचा जाणवला. नंतर काही सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यामुळे घरांमधील भांड्यांची पडझड झाली. धास्तावलेल्या गावकऱ्यांनी तालुका प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. तर सुधागड तालुक्यातील देऊळवाडी,कलाकाराई, भोप्याची वाडी, केवलेवाडी परिसरात पहाटे तीनच्या सुमारास भूगर्भातून गूढ आवाज येत असल्याची तक्रार तेथील रहिवाश्यांनी केली आहे.

महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री दोन्ही गावांना भेट दिली. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. गावकऱ्यांना पुन्हा धक्के जाणवल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्राच्या भूकंपमापकावर तसेच सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात असलेल्या भूकंप मापक यंत्रावर या धक्क्यांची कुठलीच नोंद झाली नसल्याची माहिती जिल्हाप्रशासनानाला देण्यात आली आहे. मात्र तरिही खबरदारी म्हणून पुण्यातील भारतीय भुवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेला या गावांची पहाणी करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी लोकसत्ता प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान भूकंपासारख्या धक्यामुळे तसेच भूगर्भातून येणाऱ्या आवाजांमुळे गावकरी चांगलेच धास्तावले आहेत. कालची रात्र भीतीच्या सावटात बसून काढली आहे. त्यामुळे या प्रकारांचा लवकरात लवकर शोध लावा अशी विनंती गावकऱ्यांनी प्रशासनाला केली आहे.